ढेबेवाडी (जि. सातारा) : वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान सुरू असून, येत्या दोन महिन्यांत त्याचा योग्य पद्धतीने बंदोबस्त न केल्यास कायदेशीर व सामाजिक लढा उभारावा लागेल, अशा आशयाची तक्रारवजा नोटीस भालेकरवाडी (बनपुरी, ता. पाटण) येथील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयातील वकील ऍड. प्रल्हाद भिलारे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांसह विविध खात्यांचे मंत्री व अधिकाऱ्यांना पाठवली आहे.
गेल्या काही वर्षांपासून भेडसावणाऱ्या वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाने संपूर्ण ढेबेवाडी खोरे हैराण असून, शेतकऱ्यांना शेती करणेही अवघड होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर बनपुरी- भालेकरवाडी येथील 11 शेतकऱ्यांच्या वतीने ऍड. भिलारे यांनी शासनासह स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पाठविलेल्या नोटिशीत भालेकरवाडीसह अन्य गावांमध्ये निर्माण झालेल्या बिकट स्थितीकडे संबंधितांचे लक्ष वेधले असून, कार्यवाहीसाठी त्यांना दोन महिन्यांची मुदत दिली आहे.
संबंधित शेतकरी कसत असलेल्या शेतातील विविध पिके व फळ झाडांचे वानर, मोर, डुक्करे, भटकी कुत्री आदींकडून नासाडी सुरू असून, वानरे अंगावर धावून येत आहेत. पेरणी केल्यापासून त्यांचा शिवारात उपद्रव सुरू होत असल्याने शेतकऱ्यांनी घातलेला खर्च वाया जात आहे. अवेळी पाऊस, रोगराई, लॉकडाउन, वाढती महागाई यामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणे कठीण झालेले आहे.
या पार्श्वभूमीवर घरोघरी किंवा शेतावर जाऊन जबाब नोंदविण्यात यावेत. कुंपण किंवा अन्य उपायातून वन्य प्राण्यांचा योग्य पद्धतीने बंदोबस्त करावा. या शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊन त्यांचे मालमत्ता कर, वीज, पाणीबिल कायमस्वरूपी माफ करावे. दोन महिन्यांच्या मुदतीमध्ये नोटिशीनुसार कारवाई न झाल्यास या शेतकऱ्यांना कायदेशीर व सामाजिक लढा उभारावा लागेल. त्यापासून होणाऱ्या खर्चास, तसेच नुकसानीला राज्य शासन म्हणून आपण जबाबदार राहाल, असेही नोटिशीत नमूद आहे.
""शेतकऱ्यांचे कसे व किती नुकसान होत आहे, हे नोटिशीत स्पष्टपणे नमूद केलेले आहे. माहिती व कार्यवाहीकरिता लोकप्रतिनिधींनाही त्याच्या प्रती पाठवल्या आहेत. दोन महिन्यांच्या मुदतीत योग्य कार्यवाही न झाल्यास पुढचा मार्ग मोकळा असेल.''
ऍड. प्रल्हाद भिलारे (मुंबई)
Edited By : Siddharth Latkar
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.