Satara : दुधात मिठाचा खडा! कमी दरामुळं शेतकऱ्यांचं बिघडलं अर्थकारण; दुग्धव्यवसाय दराअभावी अडचणीत

शेतीला पूरक म्हणून जिल्ह्यात दुग्धव्यवसाय करण्याकडे कल वाढला आहे.
Cow Buffalo Milk Dairy Satara
Cow Buffalo Milk Dairy Sataraesakal
Updated on
Summary

दराची अंमलबजावणी संकलन केंद्रांकडून झालीच नसल्याने हा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे.

काशीळ : दुष्काळी भागासह जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना (Farmer) आधार असणारा शेतीपूरक दुग्धव्यवसाय दराअभावी अडचणीत आला आहे. पशुखाद्यासह इतर घटकांची वाढलेली किंमत आणि दुधाला मिळणारा प्रत्यक्ष दर यांची गणिते जुळेनासी झाली आहेत. सरकारने जाहीर केलेल्या दराची अंमलबजावणी होत नसून, दूध संकलन संस्थांकडून लिटरमागे तब्बल चार ते पाच रुपये कमी दर दिला जात असल्याने पशुधन सांभाळणे परवडेनासे झाले आहे.

शेतीला पूरक म्हणून जिल्ह्यात दुग्धव्यवसाय करण्याकडे कल वाढला आहे. प्रामुख्याने तरुण शेतकऱ्यांसह महिलांचा वाढलेला सहभाग आशादायी ठरणारा आहे. सहकारातील दूध संकलन संस्था अडचणीत आल्या असल्या, तरी खासगी संस्था निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात दूध संकलन होत आहे. या संस्थांमुळे शेतकऱ्यांना घराच्या दारात मार्केट निर्मिती झाली आहे. मात्र, या व्यवसायाला घरघर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Cow Buffalo Milk Dairy Satara
'उद्या तोडगा निघाला नाही तर एकही वाहन रस्त्यावर फिरू देणार नाही'; सांगलीतील कारखानदारांना राजू शेट्टींचा इशारा

याचे प्रमुख कारण आहे, ते दुधाला मिळणारा कमी दर व या व्यवसायासाठी लागणाऱ्या घटकांचे वाढलेले दर. जुलै महिन्यात शासनाने ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या दराची अंमलबजावणी संकलन केंद्रांकडून झालीच नसल्याने हा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे.

शासन धोरण ठरतेय घातक

दुष्काळी तालुक्यात सर्वाधिक कुटुंबे दुग्ध व्यवसाय करतात. जिल्ह्यात सर्वाधिक फलटण तालुक्यात गाईचे गोठे आहेत. लाखो कुटुंबांचा आधार हा व्यवसाय असताना या व्यवसायाकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वेळा दराबाबत निर्णय होतात, मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाही. प्रतिलिटर ३४ रुपये दर देण्याचा निर्णय झाल्याने अनेक तरुण शेतकऱ्यांनी कर्ज काढून या व्यवसायात भांडवल वाढवले. दरवाढीमुळे गाईच्या किमतीही जवळपास २० ते २५ हजार रुपयांनी वाढल्या. मात्र, दराबाबत शासन धोरण घातक असल्याने शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत.

Cow Buffalo Milk Dairy Satara
सांगलीला पाणी नेण्यासाठी वीज तोडा; 'कृष्णा सिंचन'चा महावितरणला आदेश, 46 गावांतील शेतकऱ्यांवर अन्याय?

दोन महिने भाकड काळात भांडवली खर्च सुरूच

दुग्ध व्यवसायाची नियमित सायकल सुरू राहावी, यासाठी शेतकरी चार गाईंचे संगोपन करतात. सर्वाधिक एचएफ या जातीच्या गाई शेतकऱ्यांकडे आहेत. गाई व्याल्यानंतर ती २८० ते ३१० दिवस दूध देते. त्यानंतर किमान दोन महिने भाकड काळ असतो. या काळात हा भांडवली खर्च करावाच लागतो. यामुळे दहा महिने चालणाऱ्या दूध उत्पादनावर १२ महिने खर्च करावा लागतो. भाकड काळानंतर गाई गाभण राहील, या पद्धतीने नियोजन शेतकऱ्यांना करावे लागते. हा काळ लांबल्यास तोटा सहन करावा लागतो. गाई गाभण राहिल्यापासून किमान दहा ते ११ महिन्यांनी दूध सुरू होते. हे चक्र सुरू न राहिल्यास शेतकऱ्यांना तोटा सहन करण्याची वेळ येते. भाकड काळ लांबला तरी आर्थिक गणिते बिघडतात.

सहकार कोलमडला

जिल्ह्यात एकेकाळी दूध सहकारी संस्थांचे मोठे जाळे होते. यातून गावोगावी दूध संकलन केले जात होते. मात्र, या संस्थांत झालेल्या आर्थिक घोटाळ्यांमुळे जवळपास सर्व संस्था बंद पडल्या आहेत. या संस्थांची जागा आता खासगी संस्थांनी घेतली असून, या संस्थाच्या माध्यमातून दररोज सुमारे १५ लाख लिटर संकलन केले जात आहे. खासगी दूध संघ एकजूट असल्याने दराबाबत लगेच निर्णय घेऊन एकच दर दिला जातो. संस्था आपल्या अर्थकारणावर दर घसरणीचा परिणाम होऊ देत नसल्याने त्याचा भार थेट शेतकऱ्यांवर पडतो.

Cow Buffalo Milk Dairy Satara
कसाबला जिवंत पकडणाऱ्या हुतात्मा ओंबळेंच्या स्मारकाचा वनवास कधी संपणार? तब्बल 14 वर्षांपासून रखडले काम

पावडरचे दर पडले

जिल्ह्यातील एकूण दूधनिर्मितीपैकी पावणेपाच लाख लिटरचे सरासरी दैनंदिन दूध पावडरसाठी वापरले जाते. या पावडरला २८० ते ३०० रुपये किलो याप्रमाणे दर मिळत होते. इजिप्तमधून मोठ्या प्रमाणात दूध पावडरची आवक वाढली आहे. त्यामुळे पावडरच्या दरात घसरण झाली आहे. सध्या पावडरला २१० ते २१५ रुपये किलोप्रमाणे पावडर दर मिळत आहेत.

एका गाईचे दैनंदिन अर्थशास्त्र

  • तीन ते चार किलो पशुखाद्य : १०० रुपये

  • हिरवा चारा (२० ते २२ किलो) : १०० ते ११० रुपये

  • सुका चारा (चार ते सहा किलो) : १०० रुपये

  • औषधोपचार व इतर खर्च : १०० रुपये

  • दिवसभराचा एकूण खर्च : ५०० रुपये

  • एका गाईचे प्रतिदिन दूध उत्पादन : २० लिटर

  • प्रतिलिटर दूध दर : २६ ते ३० रुपये

  • प्रतिदिन प्रतिगाय उत्पन्न : ५०० ते ५५० रुपये

(यामध्ये शेतकऱ्यांचे कष्ट, मजुरी, कर्जाचे व्याज या बाबी गृहित धरलेल्या नाहीत.)

Cow Buffalo Milk Dairy Satara
'सिंधुदुर्ग किल्ल्याची शिवरायांनी जिथे स्वतःच्या हस्ते पायाभरणी केली, ते ठिकाण आता पर्यटनस्थळ बनणार'

सरकारने काय करावे?

  1. दुधाला लिटरला किमान ३४ रुपये दर दिला जावा

  2. पशुखाद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक

  3. दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे

  4. दूध पावडर दरावर नियंत्रण ठेवले जावे

  5. चारा लागवड होण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे

  6. मुरघास प्रकल्प विकासासाठी अनुदानात वाढ करावी

पशुखाद्याचे दर खूपच वाढले आहेत. त्याबरोबर हिरवा चारा, सुका चाराही महाग झाला आहे. त्यामुळे सध्या मिळत असलेले दर परवडत नसून कष्ट सगळे वाया जात आहेत. दुधाला किमान ३५ ते ४० रुपये दर मिळावा.

-अजित अभंग, विडणी, ता. फलटण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()