दहावीत प्रथम येणारा करणार ध्वजवंदन

वडगाव ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम; सरपंच आजिनाथ जाधव यांच्या संकल्पनेचे होतेय कौतुक
Indian flag
Indian flagsakal media
Updated on

बिजवडी - गावतील मुलांनी शिकून मोठे होऊन आपले व गावाचे नाव उज्वल करावे, या हेतूने वडगाव (ता.माण) ग्रामपंचायतीने मुलांच्या दर्जेदार शिक्षणावर भर दिला आहे. यासाठी वडगावचे सरपंच आजिनाथ जाधव यांच्या संकल्पनेतून गावात दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीच्या हस्ते १५ ऑगस्टला तर दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याच्या हस्ते २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन करण्याचा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून १५ ऑगस्टला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनातर्फे ‘हर घर तिरंगा,’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे औचित्य साधत वडगाव येथे सरपंच जाधव यांनी सरपंचाच्या हस्ते होणाऱ्या ध्वजवंदनाच्या परंपरेला फाटा देत दहावीच्या बोर्ड परीक्षेत गावातील प्रथम आलेल्या मुला+मुलींना ध्वजवंदन करण्याची संधी देण्याची संकल्पना मांडली. त्यादिवशी ग्रामपंचायतीच्या वतीने दहावी परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या गावातील पहिल्या पाच मुला-मुलींना सन्मानित करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे गावातील अन्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागणार आहे. आपल्यालाही ध्वजवंदनाची संधी मिळावी, यासाठी चांगले गुण मिळवून दहावीत प्रथम क्रमांक येण्यासाठी गावात स्पर्धा राहील. या उपक्रमामुळे इतरांना प्रोत्साहन मिळणार आहे. सरपंच जाधव यांनी त्यांच्या कामगिरीचा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या संकल्पनेला मंजुरी देऊन कौतुक केले.

मनाचा मोठेपणा...

ग्रामपंचायती, सोसायट्या, बँका, शाळांमध्ये ध्वजवंदन करण्यासाठी अट्टाहास धरत सरपंच, अध्यक्ष यांच्यासह विविध पदाधिकारी कायम त्यासाठी पुढे असतात. पदावर असताना मनाचा मोठेपणा दाखवत अन्य पदाधिकाऱ्यांना ध्वजवंदनाची संधी देणारेही मोजकेच असतात. मात्र, वडगावच्या सरपंचांनी आपला ध्वजवंदनाचा मान मुलांना देऊन सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे.

ध्वजवंदन करणे, हा प्रत्येकासाठी भाग्याचा क्षण असतो. ग्रामस्थांनी सरपंचपदावर संधी दिल्याने हा मान मला मिळाला. गावातील मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सर्वांनी मिळून दहावीत प्रथम येणाऱ्या मुला-मुलींच्या हस्ते ध्वजवंदन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावातील इतर मुलेही आपल्याला हा मान मिळावा, यासाठी प्रयत्न करतील.

- आजिनाथ जाधव, सरपंच, वडगाव (ता.माण).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.