उंडाळकर-चव्हाणांच्या मनोमिलनानंतर कऱ्हाडात 'आनंद'; माजी आमदार पुन्हा सक्रिय!

उंडाळकर-चव्हाणांच्या मनोमिलनानंतर कऱ्हाडात 'आनंद'; माजी आमदार पुन्हा सक्रिय!
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : डिसेंबरनंतर होणाऱ्या ग्रामपंचायत, तसेच पालिकेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार आनंदराव पाटील यांनी कऱ्हाड तालुक्यात गट बांधणी सुरू केली आहे. काँग्रेस पक्ष व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी फारकत घेतल्यानंतर आनंदराव पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात राहिली आहे. काका-बाबा गट एकत्र आल्यानंतर आता पुन्हा एकदा आनंदराव पाटील सक्रिय झाले आहेत. तसेच त्यांनी यापुढील सर्व निवडणुकीत संपूर्ण ताकदीने लढण्याची भूमिका घेतली आहे, तर कोणत्या पक्षासोबत राहायचे याबाबत ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.   

काँग्रेस पक्षाच्या जुन्या फळीतील नेते माजी आमदार आनंदराव पाटील यांनी घेतलेली फारकतीची उंडाळकर गट व पृथ्वीराज चव्हाण गटाच्या मनोमिलनांनतर चर्चा सुरू झाली आहे. माजी आमदार पाटील यांच्या हालचालीकडे लक्ष आहे. आमदार चव्हाण यांचा सगळा कारभार माजी आमदार पाटील यांच्या पुढाकाराने नेहमीच सांभाळला गेला. आमदार चव्हाण 1991 मध्ये खासदारीकीची पहिली निवडणूक लढले. त्यावेळी श्री. पाटील यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. नेहमीच आमदार चव्हाण यांच्या प्रचाराची व सत्तेत असताना मतदार संघात त्यांची बाजू सांभाळण्याचे काम माजी आमदार पाटील यांनी केले. आमदार चव्हाण यांची सावली अशीच माजी आमदार पाटील यांची जिल्ह्यात ओळख होती. प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या काळातही श्री. पाटील यांनी काम केले. श्री. पाटील यांनी पक्षातील संघटनात्मक पदांवर काम केले. त्याला चव्हाण यांचा नेहमीच ग्रीन सिग्नल राहिला. त्यांना आमदारकीही दिली. त्यामुळे पाटील व चव्हाण यांची आघाडी कधी फुटणार नाही, असा राजकीय अंदाज 2019 मध्ये फोल ठरला. श्री. पाटील यांचा गट आमदार चव्हाण यांच्यापासून दुरावला. त्याची राज्यभर चर्चा झाली. विधानसभेच्या तोंडावर पाटील यांच्या प्रताप व मानसिंग सुपूत्रांसह पुतणे सुनील पाटील यांनी भाजपमध्ये उडी घेतली. त्यामुळे चव्हाण व पाटील यांच्यात दरी वाढली. 

विधानसभेच्या मोक्यात आमदार पाटील यांनी गट सोडला होता. तरीही आमदार चव्हाण यांच्या गटात मात्र, शांतता होती. विधानसभेनंतर थंड असलेल्या राजकीय हालचाली कोरोनाचा प्रभाव ओसरू लागल्याने पुन्हा एकदा गतीत आली. काल परवा आमदार चव्हाण व उंडाळकर गट एकत्रित आले. आगामी ग्रामपंचायती, पालिकेच्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव राहणार आहे. त्यासाठी आनंदराव पाटील यांनी बांधणी सुरू केली आहे. ते गटबांधणी करणार आहेत. सर्व निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरे जाण्याचा त्यांचा मनोदय आहे. त्यादृष्टीनेही त्यांनी आखणी केली आहे. मात्र, काळ अन वेळ सारे ठरवेल, असा विश्वास व्यक्त करताना श्री. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे लक्ष लागून आहे. स्वर्ग व नरक या सगळ्या कल्पना आता केवळ गोष्टीत उरल्या आहेत. येथे केलंय येथेच फेडायचे आहे, अशी पद्धत रूढ होते आहे. त्यामुळे न्याय झाला की, अन्याय ते काही काळ गेल्यानंतरच साऱ्यांच्या समोर येईल. मी जिंकलो, काँग्रेस हारली या वृत्तीच्या लोकांसोबत काँग्रेस बांधली आहे. त्याचेही दुरगामी परिणाम त्यांना सोसावे लागणार आहेत. 

स्वर्ग व नरक या सगळ्या कल्पना आता केवळ गोष्टीत उरल्या आहेत. येथे केलंय येथेच फेडायचे आहे, अशी पद्धत रूढ होते आहे. त्यामुळे न्याय झाला की, अन्याय ते काही काळ गेल्यानंतरच साऱ्यांच्या समोर येईल. मी जिंकलो, काँग्रेस हारली या वृत्तीच्या लोकांसोबत काँग्रेस बांधली आहे. त्याचेही दुरगामी परिणाम त्यांना सोसावे लागणार आहेत. 

-आनंदराव पाटील (माजी आमदार, कऱ्हाड)

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.