सातारा : जिल्ह्यातील आमदार, खासदारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना नियमांचे उल्लंघन चालते, मग सण-उत्सवांना निर्बंधांचा बडगा का? असा सवाल करत काल झालेल्या बैठकीत गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसले. पोलिस प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवत वाद्यांना परवानगी दिली नाही, तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा विसर्जन मिरवणूक सुरू करण्याची भूमिका मंडळांनी मांडली आहे.
त्यावर आवाजाच्या मर्यादेत रात्री १२ नंतरही सवाद्य मिरवणूक सुरू ठेवण्याची भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना सांगितली आहे. त्यामुळे साताऱ्यातील मिरवणुकीत रात्री बारानंतर वाद्य थांबणार की नाही, तसेच मिरवणूक बारानंतर सुरू राहणार की थांबवून सकाळी सहाला पुन्हा सुरू करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विसर्जन मिरवणुकीचा हा पेच पोलिस अधीक्षक समीर शेख यांना सोडवावा लागणार आहे.