ढेबेवाडी - मराठवाडी धरणाचे पाणी शाळेच्या आवारात पोचायची वेळ आली, तरीही मेंढ (ता. पाटण) येथील श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाच्या स्थलांतराबाबतीत शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने बिकट पेच निर्माण झाला आहे. खबरदारी म्हणून आता शाळेला पावसाळी सुटी देण्याशिवाय पर्याय उरला नाही. तशी मागणीही संबंधित शिक्षण संस्थेने शिक्षण विभागाकडे केली आहे.
मराठवाडी धरणग्रस्तांच्या पुनर्वसन प्रकियेला गती देत असताना तेथील स्थानिक शिक्षण संस्थांच्या विद्यालयांच्या स्थलांतराबाबत मात्र शासनाने ठोस भूमिका न घेतल्याने गेल्या काही वर्षांपासून संबंधित संस्था, विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि बाहेर गावांतून येणारे विद्यार्थी हे सारेच पेचात आहेत. यापैकी उमरकांचन येथील सह्यगिरी शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल हे माध्यमिक विद्यालय आगाशिवनगर (ता. कऱ्हाड) येथे हलविण्यास अलीकडेच शासनाने परवानगी दिली. त्यांनी तिकडे स्थलांतरही केले आहे.
मेंढ येथील श्री ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेच्या श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाबाबत मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. यंदा मराठवाडी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यात येणार आहे. लवकरच पाणी शाळेच्या आवारात पोचेल, अशी परिस्थिती आहे. या विद्यालयात मेंढ, मत्रेवाडी, सलतेवाडी, जाधववाडी, निवी, कसणी, निगडे, घोटील व त्या परिसरातील वाड्या-वस्त्यांतून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. १९८३ मध्ये हे विद्यालय सुरू झाले. संस्थेचे हे एकमेव विद्यालय आहे. सहावी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून पाच शिक्षक व तीन कर्मचारी सेवा बजावतात. खडतर परिस्थिती असतानाही विद्यालयाने गुणवत्ता कायम जपली आहे. आता धरणात पाणी भरत असतानाही स्थलांतराबाबत निर्णय होत नसल्याने संबंधित सर्वच घटकांत अस्वस्थता वाढत आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयीनेच स्थलांतराची गरज...
पावसाळ्यातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन विद्यालयाने यंदा उन्हाळी सुटी न घेता निकाल लावून अभ्यासक्रम पुढे सुरूच ठेवला. त्यामुळे पावसाळ्यात सुटी घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा प्रश्नच येणार नाही. संस्था व विद्यालयाने शिक्षण विभागाकडे तशी मागणीही केली आहे. अद्याप त्यावर निर्णय नाही. दुर्गम डोंगर भागातील सुमारे पंधरा किलोमीटरच्या परिसरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यास येतात. कसणी येथील माध्यमिक विद्यालय मान्यतेच्या कारणास्तव काही वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मेंढ विद्यालयाशिवाय आधारच नाही. त्यामुळे हे विद्यालय दूरच्या ठिकाणी हलविणेही गैरसोयीचे असल्याने संबंधित गावांच्या सोयीचे ठिकाण शोधून तेथेच स्थलांतर करणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.