सातारा : साता-याच्या इतिहासात आठ सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. १८५७ च्या बंडात सहभाग असणारे साता-याचे सतरा नरवीर आजच्या दिवशीच हुतात्मा झाले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी गेंडामाळ येथे फाशीचा वड उभारला आहे. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी सातारकरांकडून फाशीचा वड येथे अभिवादन करण्यात येत असते.
क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सातारा जगभर ओळखला जातो. देशावरील प्रत्येक संकटावेळी सातारा जिल्हा धावून आला. १८५७ चा लढा स्वातंत्रसंग्रामातील महत्त्वाचा मानला जातो. १८५७ चे बंड म्हणजे, भारतीय स्वातंत्र लढ्यातील एक महत्वाचे पर्व. कारण, याच दिवशी १८५७ च्या बंडात सहभागी असणा-या १७ क्रांतीवीरांना जुलमी ब्रिटिश सरकारने मृत्यूदंड दिला.
यात नारायण पावसकर सोनार, केशव चित्रे, शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी (वाकनीस), सीताराम गुप्ते यांना फाशी देण्यात आली, तर मुनाजी भांदिर्गे, सखाराम शेट्ये, बाब्या शिरतोडे, येषा गायकवाड, गणेश कारखानीस, नाना रामोशी यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. रामजी चव्हाण, नान्या रामोशी, शिवाजी पाटोळे, पर्वती पाटोळे, पतालू येसू यांना गोळ्या घालण्यात आल्या. गेंडामाळावरील फाशीचा वड येथे ही शिक्षा ठोठावण्यात आली. या शहिदांच्या स्मृती आजही सातारकर जागवताना दिसताहेत.
या शहिदांची स्मृती चिरकाल रहावी, म्हणून स्वातंत्र्योतर काळात येथे स्मारकही उभारण्यात आले. वेळोवेळी त्याचे नूतनीकरणही केले गेले, परंतु ८ सप्टेंबर हा दिवस मात्र विस्मृतीत गेला. १८५७ च्या बंडासाठी इंग्रजांची २२ वी फलटण फितूर करण्याची महत्वाची कामगिरी करणारा मानसिंग हा ही एक क्रांतिकारक होता. जो फितुरीमुळे पकडला गेला व ताबडतोब १२ जून रोजी त्याला तोफेच्या तोंडी दिले गेले.
मात्र, कोणत्याही स्मारकावर त्याचा साधा नामोल्लेख देखील नाही, अशी खंत जिज्ञासाचे मार्गदर्शक गणपतराव साळुंखे यांनी व्यक्त केली. या क्रांतिकारकांच्या नावांत, वेगवेगळ्या साधनांत मतांतरे आढळतात, त्यामुळे अस्सल साधनांचा अभ्यास करुन मूळ नावांचा शोध घेण्याचा मनोदय जिज्ञासातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.