पालकमंत्री बदलण्याचा धाडसी निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेणार का? याची सातारकरांना उत्सुकता आहे.
सातारा : शिंदे- फडणवीस- पवार सरकारने नुकतीच काही जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले. दोन जिल्ह्यांची जबाबदारी असलेल्यांचा एक जिल्हा काढून घेत तिथे दुसऱ्यांना संधी दिली. या बदलामुळे आता साताऱ्याचे पालकमंत्रिपद (Satara Guardian Minister) कधी बदलले जाणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट पहिल्यापासूनच साताऱ्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहे. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून पालकमंत्रिपद शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना दिले आहे; पण त्यांच्या कार्यपध्दतीवर अधिकाऱ्यांसह जनतेतही नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे.
याची दखल घेऊन साताऱ्याचा पालकमंत्री बदलण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार का? याची सातारकरांना उत्सुकता आहे. शिवसेनेत फूट पाडून भाजपने महाविकास आघाडीची सत्ता उलथवत भाजप व एकनाथ शिंदे गट शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर एकनाथ शिंदेंचे विश्वासू म्हणून शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रिपद आणि सातारा व ठाण्याचे पालकमंत्री पद दिले.
सातारा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून, ठाणे हा मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मुलाचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आपल्या विश्वासू नेत्यावर त्यांनी दोन्ही ठिकाणची जबाबदारी दिली. त्यामुळे मंत्री देसाई जिल्ह्यात प्रतिमुख्यमंत्री म्हणूनच वावरत असल्याचे अनेक अधिकारी -कर्मचाऱ्यांत खासगीत चर्चा सुरू आहे. पालकमंत्री म्हणून काम करताना मंत्री देसाई यांनी पोलिस व प्रशासनावर आपला सर्वाधिक वचक ठेवला आहे. यातून कधी साताऱ्यात, कधी पाटणमध्येही त्यांच्या बैठका होतात.
जिल्ह्यातील जनता पालकमंत्र्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत; पण त्यांचे सर्व लक्ष पाटणवरच आहे. दुष्काळी तालुक्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली नाही. पुसेसावळीत दंगल झाल्यानंतर अनेक नेते मंडळींनी गावात जाऊन भेट दिल्या. ग्रामस्थांची, बाधित कुटुंबांची भेट घेतली; पण पालकमंत्री सर्व काही शांत झाल्यावर पुसेसावळीत पोचले.
याची सल जिल्ह्यातील जनतेच्या मनात आहे. ते शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेहमीच खरडपट्टी काढत असतात. नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांसमोरच त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना झापडले होते. त्यामुळे पोलिस, महसूलसह इतर अधिकाऱ्यांत ही त्यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे. केवळ ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मंत्री आहेत, म्हणून अधिकारी सर्व सहन करत असल्याचे दिसून येते.
मध्यंतरी राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार यांच्यासोबत ३२ आमदार बाहेर पडले. ते शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. पवारांच्या राष्ट्रवादीला नऊ मंत्री पदे मिळाली. काल मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची नवीन यादी जाहीर केली. त्यामध्ये पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांना दिले आहे.
आता साताऱ्याचे पालकमंत्रिपदासाठी श्री. पवार आग्रही आहेत; पण मंत्री शंभूराज देसाई हे विश्वासू असल्याने त्यांच्याकडून आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्रिपदाचा कार्यभार काढून घेऊन तो अजित पवार यांच्या गटाच्या नेत्याला देण्यास ते तयार होणार का? हे ही महत्त्वाचे आहे. त्यामुळे अधिकारी व जनतेची नाराजी उघड नसली, तरी आतून असलेली खदखदीची दखल घेऊन पालकमंत्री बदलण्याचा धाडसी निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेणार का? याची सातारकरांना उत्सुकता आहे.
अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले, त्यावेळी साताऱ्यातून वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीत होते; पण ते वेळेत पोचले नाहीत. त्यांना मंत्रिपद देऊन साताऱ्याचे पालकमंत्रिपद देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडे साताऱ्याचे पालकमंत्रिपद येण्यापूर्वी मकरंद पाटलांची मंत्रिपदी वर्णी लागल्यास पालकमंत्रिपदी त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री पवार आग्रही राहणार, हे नक्की.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.