सातारा : शतकाकडे वाटचाल करणाऱ्या हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गुरुवार पेठेतील गुरुवार तालीम गणेशोत्सव मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात १९२८ मध्ये झाली. मुस्लिम धर्मीयांचा ताबूत उत्सव आणि हिंदू बांधवांचा गणेशोत्सव गुरुवार तालीम येथे एकत्रितरीत्या साजरा केला जातो, हा सद्यःस्थितीत समाजाला दिशादर्शक आदर्श आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात गुरुवार तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. (कै.) कोंडीराम गवळी (सावकार), (कै.) नाना पानसरे, (कै.) अब्दुलभाई शेख, (कै.) बाजीराव यादव आदींच्या माध्यमातून ही स्थापना झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात नागरिकांच्या हृदयात देशप्रेम जागे करण्याची गरज होती. त्यावेळी मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात होते. उत्सवाच्या माध्यमातून लोक एकत्र येत होते. त्यावेळी देशभक्तीचा संदेश दिला जात होता. आजही ताबूत आणि गणेशोत्सव साजरा करून गुरुवार तालीम ऐक्याचा संदेश देत आहे.