राजकीय नाराजी भोवल्याने त्यांची तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा आहे.
सातारा : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Collector Ruchesh Jayavanshi) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Dudi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाचा कार्यक्षम जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्यानंतर ४८ तासांच्या आत श्री. जयवंशी यांची राज्य शासनाने बदली केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शासनाने दहा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आज जाहीर झाले.
यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. जयवंशी यांच्या बदलीसंदर्भात कोणताही तपशील देण्यात आलेला नाही. नवे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे मूळचे जयपूर (राजस्थान) येथील झुन्झुनु जिल्ह्यातील आहेत. स्वामी केशवानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड ग्रामोथान येथे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे.
ते २०१६ मधील बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सुरुवातीला त्यांची झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त झाली होती. केंद्र शासनाकडे सहायक सचिव म्हणून काम केले आहे. २०१८ मध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्र केडरकडे त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे प्रांताधिकारी म्हणूनही काम केले आहे.
सध्या ते सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होते. त्यांची पत्नी महाराष्ट्र पोलिस दलात आयपीएस केडरच्या अधिकारी आहेत. आज त्यांची साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. नवे जिल्हाधिकारी डुडी आज पदभार स्वीकारणार आहेत.
रुचेश जयवंशी यांनी जुलै २०२२ मध्ये जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पश्चिम भागातील महाबळेश्वर, पाचगणी, कास येथील अवैध बांधकामे, मॅप्रो गार्डनबाबत घेतलेली कडक भूमिका यातून त्यांना राजकीय नाराजी भोवल्याने त्यांची तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा आहे.
गेल्या १५ महिन्यांत जिल्ह्यात पायभूत सुविधांचा विकास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकास कामांचे बळकटीकरण ही कामे त्यांनी मार्गी लावली. राज्य शासनाचा कार्यक्षम जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्यानंतर ४८ तासांच्या आत श्री. जयवंशी यांची राज्य शासनाने बदली केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सध्या चालू असलेली महाबळेश्वरमधील अतिक्रमण विरोध मोहीम व येणाऱ्या काळात कास अतिक्रमणावर पडणारा हातोडा याचाच लोकप्रतिनिधींनी धसका घेतल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.