Illegal Hoarding : सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर होर्डिंगचा बाजार

३७२ अनधिकृत होर्डिंगवर प्रशासन टाकणार हातोडा, ३१ तातडीने हटविणार, १४१ होर्डिंगचे ऑडिट होणार
Illegal Hoardings
Illegal Hoardingssakal
Updated on

सातारा : मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेचे पडसाद सातारा जिल्ह्यात सर्वाधिक उमटले आहेत. जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत सर्वच होर्डिंग काढण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सर्वाधिक होर्डिंग हे जिल्ह्यातील आठ पालिकांच्या हद्दीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी मागविलेल्या अहवालात तब्बल ३७२ होर्डिंग अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. या सर्वांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार असून, सध्या तरी धोकादायक व विनापरवानगी असलेले ३१ होर्डिंग काढून टाकण्यात येणार आहेत, तर उर्वरित १४१ होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे.

मुंबईत वादळी पावसात होर्डिंग कोसळून १८ जणांचा बळी गेला. यानंतर राज्य सरकार व प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी राज्यभरातील होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारला.

त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात होर्डिंगवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका, बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून कारवाईच्या सूचना केल्या. या दुर्घटनेचे सातारा जिल्ह्यात पडसाद उमटले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व पालिकांचे मुख्याधिकारी, महामार्गाचे अधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना ग्रामीण भागातील होर्डिंगचा अहवाल तयार करण्याची सूचना केली होती, तसेच धोकादायक होर्डिंग तातडीने हटविण्याची सूचना केली होती.

त्यानुसार अहवाल उपलब्ध झाला असून, मोठ्या प्रमाणात होर्डिंग हटविण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील आठ पालिकांच्या हद्दीत तब्बल ५४३ होर्डिंग असून, यापैकी परवानगी घेतलेले अधिकृत १७१ होर्डिंग असल्याचे पाहणीत उघड झाले आहे. उर्वरित तब्बल ३७२ होर्डिंग बेकायदेशीर आहेत.

ही बेकायदेशीर होर्डिंग काढणे किंवा नियमित करून घेणे हाच आता पर्याय संबंधितांपुढे आहे. कारण यातील ३१ होर्डिंग पाहणी दरम्यान, धोकादायक असून, ती तातडीने हटविण्याची सूचना करण्यात आली आहेत, तर १४१ होर्डिंग नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे.

ऑडिटमध्ये पास झाली तर ही होर्डिंग राहणार आहेत, अन्यथा त्यावरही कारवाई होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाच जूनपर्यंत होर्डिंग नियमित करण्यासाठी मुदत दिली आहे.

या दिलेल्या मुदतीत नियमित करण्याची कार्यवाही झाली नाही, तर जिल्हा प्रशासन ही होर्डिंग स्वत:हून हटविणार असून, त्यासाठी होणारा खर्च व दंड संबंधित मालकावर लावला जाणार आहे.

जिल्ह्यातील आठ पालिकांच्या हद्दीत असलेली होर्डिंगच्या उभारणीचे दर वेगवेगळे आहेत. आता बेकायदेशीर होर्डिंग काढण्याचे काम पालिकांच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात येत आहे.

जेथे मोठी होर्डिंग आहेत, ती त्यांच्या मालकांना काढून टाकण्यास सांगितली आहेत. सहा जूननंतर जिल्हा प्रशासन सर्वच होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारणार आहे.

महामार्गालगत जास्त लक्ष

ग्रामीण भागातील होर्डिंगचा अहवाल अद्याप आलेला नाही. ग्रामीण भागात साधारण २५० होर्डिंग असून, यामध्ये महामार्गाच्या कडेने असलेल्या होर्डिंगवर सर्वांत जास्त लक्ष जिल्हा प्रशासनाचे राहणार आहे.

ज्यांच्याकडे परवानगी नाही, त्यांनी स्वत:हून ही होर्डिंग काढण्यास सुरुवात केली आहे, तर काही ठिकाणी नेत्यांच्या वाढदिवसाला फ्लेक्स लावण्यासाठी होर्डिंग उभारली आहेत. त्यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अशा होर्डिंग चालकांची अडचण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.