'ग्रामपंचायत कक्षेत धार्मिक ठिकाणे, शाळा परिसरात बॅनर लावू नयेत. ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन बॅनर जास्तीतजास्त सातच दिवस लावावेत.'
ढेबेवाडी : गावासह ग्रामपंचायत कक्षेतील बाजारपेठेच्या परिसरात उघड्यावर कचरा (Garbage) टाकताना कोणी आढळल्यास त्याचा फोटो मोबाईलवर (Mobile) काढून ग्रामपंचायतीला पाठवा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना मंद्रुळकोळे (ता. पाटण) ग्रामपंचायतीने ग्रामसभेत जाहीर केली. त्याद्वारे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीचे (Mandrulkole Gram Panchayat) कार्यक्षेत्र मोठे आहे. ढेबेवाडी बाजारपेठेचाही बराच भाग त्यात समाविष्ट आहे. उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण मोठे आहे. ओढ्याची पात्र तसेच रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग पडल्याचे चित्र आहे. मंद्रुळकोळे येथे सरपंच भाग्यश्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत कचऱ्याच्या प्रश्नांवर चर्चा होऊन उघड्यावर कचरा टाकतानाचा फोटो ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांच्या मोबाईलवर पाठवणाऱ्याला बक्षीस देण्याचा आणि कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला. फोटो पाठवणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत कक्षेत धार्मिक ठिकाणे, शाळा परिसरात बॅनर लावू नयेत. ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन बॅनर जास्तीतजास्त सातच दिवस लावावेत. स्थानिकाव्यतिरिक्त इतरांना दिवसाला ५० रुपये भाडे आकारले जाईल. विनापरवाना तसेच जास्त दिवस लावलेले बॅनर जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे जाहीर करून ठराव करण्यात आला. स्ट्रक्चरल ऑडिट, विवाहित मुली व रहिवासी नसलेल्यांची मतदार याद्यातील नावे कमी करणे, गाव व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पाणीपुरवठा योजनेची सद्यःस्थिती, घरांचे सर्वेक्षण, नोंदी, आदीबाबत चर्चा व ठराव झाले.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे- पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करून पाठिंबा दर्शविण्यात आला. मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे गावचे सुपुत्र (कै.) आमदार अण्णासाहेब पाटील यांचे या निमित्ताने स्मरण करून अभिवादन करण्यात आले. प्राना फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची पाटील, युवा नेते रणजित पाटील, अॅड. सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले. उपसरपंच सर्जेराव कदम, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक संतोष घोडे यांनी आभार मानले.
कचरामुक्त गाव परिसर निर्मितीसाठी ग्रामपंचायतीने वेगवान पावले टाकायला सुरवात केली आहे. प्लॅस्टिक कचरा संकलनासाठी व्यापारी पेठेत कचराकुंड्या सक्तीच्या करण्यात येणार आहेत.
-भाग्यश्री पाटील, सरपंच, मंद्रुळकोळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.