GST आयुक्तांच्या रिसॉर्टला वीजपुरवठ्यासाठी 51.86 लाख, आमदार पाटलांकडून शासकीय निधीचा गैरवापर; काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे गाव पुनर्वसित झाले असून, या ठिकाणी कोणतीही मानवी वस्ती नाही.
Jhadani Case MLA Makarand Patil
Jhadani Case MLA Makarand Patil esakal
Updated on
Summary

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी केलेल्या आरोपावर मकरंद पाटील यांनीही पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडलीये.

सातारा : झाडाणी प्रकरणातील (Jhadani Case) जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी (GST Commissioner Chandrakant Valvi) यांच्या रिसॉर्टला वीजपुरवठा करण्यासाठी आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी आपल्या पदाचा व शासकीय निधीचा गैरवापर केला आहे. जिल्हा नियोजन समितीतून २२ केव्ही एचटी लाईन टाकून वीजपुरवठा देण्यासाठी तब्बल ५१ लाख ८६ हजार ५४० रुपयांचा निधी वापरला आहे. त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांच्यावर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी केली आहे.

श्री. शिंदे यांनी आज काँग्रेस (Congress) भवनात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे गाव पुनर्वसित झाले असून, या ठिकाणी कोणतीही मानवी वस्ती नाही. येथील ग्रामस्थांचे रायगडला पुनर्वसन झाले आहे. मात्र, या गावात नंदुरबार, अहमदाबाद, गुजरात, मुंबई येथील काही अधिकाऱ्यांनी व राजकीय वलय असलेल्यांनी एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. त्या ठिकाणी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी सालोशी येथील वळवी वस्ती येथे आदित्य चंद्रकांत वळवी यांच्या नावे बांधकाम केले आहे.

Jhadani Case MLA Makarand Patil
'शक्तिपीठ महामार्गाचा विषय संपलाय, यानंतर कोणाला आंदोलन करायचं असेल तर ते करू शकतात'; असं का म्हणाले चंद्रकांतदादा?

सलोशी येथील वळवी व सावेवस्ती येथे आदित्य चंद्रकांत वळवी यांनी सुमारे ४० एकर परिसरात बेकायदेशीर बांधकाम करून रिसॉर्ट बांधले आहे. त्यासाठी अनेक वृक्षांची कत्तल केली आहे. या रिसॉर्टला वीजपुरवठा देण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून ५१ लाख ८६ हजार ५४० रुपयांचा निधी येथे वापरला आहे. या निधीचा वापर करून त्यांनी २२ केव्ही एचटी लाईन पाच किलोमीटर ओढली आहे, तसेच ०.३५ किलोमीटर एलटी लाईन टाकली आहे. यातून या रिसॉर्टला वीजपुरवठा केला आहे. वीज वितरण कंपनीने आमदार पाटील यांच्या शिफारशीने वीजपुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे.’’

वळवी वस्ती अस्तित्वात नसूनही आमदार पाटील यांनी पदाचा गैरवापर करून व अधिकाऱ्यांवर दबाव आणून रिसॉर्टला वीजपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नियोजन समितीकडून दिला गेलेला हा निधी स्वत:च्या फायद्यासाठी वापरला आहे. या परिसरात आजही खिरखिंड, म्हाळुंगे, शेलटी, देऊर, तळदेव, मायणी ही गावे अस्तित्वात असून, त्यांना आजही विजेअभावी अंधारात राहावे लागत आहे. त्यामुळे या विद्युतीकरणाची चौकशी व्हावी, तसेच आमदार मकरंद पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्यांनी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांची आमदारकीही रद्द करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. याबाबत सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Jhadani Case MLA Makarand Patil
Cooperative Societies Election : सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 'या' तारखेपर्यंत स्थगिती; राज्य शासनाचा आदेश जारी

अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी

मकरंद पाटील यांना पदमुक्त करावे, अशी मागणी आम्ही विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले, ‘‘त्यांच्यावर गुन्हा दाखल करून ज्या अधिकाऱ्यांनी दबावाखाली बेकायदेशीर कामे केली आहेत त्यांच्यावरही कारवाई करावी. झाडाणीला अनेक ठिकाणी शासकीय योजनेतून अनेक रस्ते व साकवाची कामे धनिकांच्या सोयीसाठी शासकीय निधीतून केली आहेत.

स्थानिकांच्या मागणीनुसार विद्युतीकरण : मकरंद पाटील

महाबळेश्वर : सालोशीतील वळवी वस्तीवरील विद्युतीकरणाचे काम उपसरपंच विठ्ठल मोरे व स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मंजूर केले होते. यात कोणा एका व्यक्तीच्या फायद्याचा हेतू नव्हता. चंद्रकांत वळवी यांच्याशी माझा कसलाही संबंध नाही. तरीही माझ्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन कोणीतरी बेछूट आरोप केले आहेत. केवळ जनतेच्या हिताचा विचार करून मी कामे करीत असल्यामुळे माझी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे, असे स्पष्टीकरण आमदार मकरंद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

Jhadani Case MLA Makarand Patil
Hajj Pilgrims : उष्माघातामुळं तब्बल 900 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू; कोल्हापुरातील 444 हज यात्रेकरू सुखरूप

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी केलेल्या आरोपावर मकरंद पाटील यांनी पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली. श्री. पाटील यांनी पत्रकात म्हटले, की सालोशी येथील वळवी वस्तीवर विद्युतीकरण करणे, हे काम जिल्हा नियोजन आराखड्यांतर्गत तेथील उपसरपंच विठ्ठल मोरे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मंजूर केले होते. या लाईनमुळे आजूबाजूच्या गावांतील लोकांना रोहित्र बसविल्यास विजेचा व पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. हे पत्र विद्युतीकरणासाठी दिलेले होते. यामध्ये किती रक्कम लागणार, हे नमूद नव्हते. अंदाजपत्रक हे संबंधित अधिकारी करतात. त्यामुळे यात कोणा एका व्यक्तीचा फायदा व्हावा, असा कोणताही हेतू नव्हता.

चंद्रकांत वळवी यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. लोकप्रतिनिधींनी शिफारस पत्र दिल्यानंतर संबंधित गावाची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करणे प्रशासनाचे आणि अधिकाऱ्यांचे काम असते. सामान्य जनतेला न्याय मिळावा, या हेतूने दिलेल्या पत्राचा कोणीही राजकारणासाठी वापर करू नये. याप्रकरणी कोणीही दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई करावी. माझे कोणाशी कसलेही हितसंबंध गुंतलेले नाहीत. मी फक्त जनतेच्या हिताचा विचार करून कामे करीत असतो. त्यामुळे माझी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. विविध कामासांठी त्या-त्या भागातील कार्यकर्ते विविध प्रश्न आणि कामासाठी शिफारस पत्र मागत असतात. लोकांच्या अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने अशी पत्रे दिली जातात. त्यातून झालेल्या विकासकामाचा फायदा किंवा गैरफायदा कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घेत असेल तर त्याची माहिती प्रशासनाने घेतली पाहिजे. चुकीचे काही घडले असल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी. असे पत्रकात म्हटले आहे.

आमदारांकडे कामाची मागणी

सालोशी येथे वळवी वस्ती असून, या ठिकाणी सहा घरे आहेत. या विद्युत लाईनमुळे रोहित्र बसविल्यास परिसरातील दोन-तीन गावांतील लोकांना ज्या विहिरीवरून पाणी आण्यासाठी पायपीट करावी लागते. ती गैरसोय दूर होणार आहे. मी व ग्रामस्थ आमदार मकरंद पाटील यांच्याकडे कामाची मागणी करण्यासाठी गेलो होतो. त्यानुसार आमदार पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पत्राद्वारे शिफारस केली आहे, असे सालोशी येथील उपसरपंच विठ्ठल मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.