कलेढोण - मुकी जनावरे आणि माणसाचं नातं अतूट असतं. घरातील मांजर, कुत्रा, गाय, बैल, शेळ्या आदी पाळीव प्राण्यांना माणसं जीव लावतात. तेवढाच जीव प्राणीसुद्धा लावतात. यातील कुत्रा हा इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. मालक आणि त्याच्यातील नातं हे किती घट्ट असते, याची अनेक उदाहरणे आपल्या सभोवताली घडतात. अशाच एका टॉमी नावाच्या कुत्र्याने मालक आजारी पडल्याने दाखल झालेल्या हॉस्पिटलच्या आयसीयूकडे धाव घेतली. तीन दिवस उपाशी राहिल्यानंतर टॉमीने आपल्या मालकाच्या हस्ते बिस्किटे खाऊन आपले मौन सोडले.
मायणी कचरेवाडीतील प्रकाश पांडुरंग कदम यांच्या छातीत वेदना होत असल्याने मायणीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिरावण्यास तीन-चार दिवस गेले. मात्र, घरात आपला मालक दिसत नाही म्हटल्यावर टॉमीही बैचेन झाला. त्याने नातेवाइकाच्या पाठीमागे जाऊन चांदणी चौकातील हॉस्पिटल गाठले.
आपले नातेवाईक इथे दिसत असले तरी मालक दिसेनात म्हणून तो हॉस्पिटलच्या बाहेर तीन दिवस अन्नपाणी सोडून पडून राहिला. ही गोष्ट हॉस्पिटलचे डॉ. शशिकांत कुंभार, सूर्यकांत कुंभार व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. कर्मचाऱ्यांनी व नातेवाइकांनी टॉमीला चपाती-भाकरी खायला दिली. मात्र, टॉमीने त्यास तोंड लावले नाही.
शेवटी कदम यांच्या नातेवाइकांनी डॉ. कुंभार यांच्याकडे कदम यांना पाच-दहा मिनिटे आयसीयूतून बाहेर सोडण्याची विनंती केली. माणुसकीच्या या नात्यासाठी डॉक्टरांनी कदमांना बाहेर जाण्यासाठी परवानगी दिली. आपला मालक बाहेर येताच टॉमीने शेपूट हलवत मालकाच्या अंगावर झेपा घेण्यास सुरुवात केली. विविध आवाज काढीत टॉमी खूष झाला. कदम यांनी टॉमीला घरी जाण्यास सांगितले.
मात्र, तो जागचा हलला नाही. त्यानंतर तीन दिवस काही न खाल्लेल्या टॉमीला मालकाने बिस्किटे देऊ केली. टॉमीने ते आनंदाने खाल्ली. आधुनिक युगात माणसांना माणसे विचारत नाहीत. मात्र, टॉमी या कुत्र्याचे मालकाप्रती प्रेम पाहून हॉस्पिटलमधील कर्मचारी, नातेवाईक व उपस्थित सर्वजण भारावून गेले.
याचवेळी सुप्रसिद्ध कलाकार कै. दादा कोंडके यांनी ‘वाघ्या’ या कुत्र्यावरील चित्रित केलेल्या गाण्यातील ‘नाही मिळालं पोटाला तरी, धन्यासाठी तू मरतुया’ हे वाक्य आपणास नक्की आठविल्याशिवाय राहत नाहीत.
मालकासाठी एखादा प्रामाणिक कुत्रा तीन दिवस उपाशी राहिल्याचे आश्चर्य वाटले. मुके प्राणी व माणूस यांच्यातील प्रेम, जिव्हाळ्याची अनेक उदाहरणे आहेत. आमच्या हॉस्पिटलमधील ही भावुक व बोलकी घटना आहे.
- डॉ. सूर्यकांत कुंभार, मायणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.