यात्रेसाठी मांढरगडावर भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
वाई : महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटक (Karnataka) राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव (ता. वाई) येथील काळेश्वरी देवीच्या यात्रेस (Kaleshwari Devi Yatra) कालपासून प्रारंभ झाला. आज पौष पौर्णिमेला (ता. २५) यात्रेचा मुख्य दिवस आहे. या वेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्या हस्ते व ट्रस्टचे अध्यक्ष व अतिरिक्त जिल्हा न्या. एस. जी. नंदीमठ, प्रशासकीय विश्वस्त प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सोनाली मेटकरी, वाईचे पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, विश्वस्त यांच्या उपस्थितीत देवीची मुख्य पूजा होणार आहे.
यात्रेसाठी मांढरगडावर भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. यात्रेच्या अनुषंगाने गडावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आज सकाळपासून प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, गटविकास अधिकारी, तसेच पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, सचिन चव्हाण आदींनी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. रात्री देवीचा जागर झाला. या जागराला देवीची मानाची पालखी गावातून वाजत- गाजत मंदिराकडे आणण्यात आली.
आज शाकंभरी पौर्णिमेला पहाटे सहा वाजता देवीची मुख्य पूजा बांधली जाणार आहे. यात्रेनिमित्ताने येणाऱ्या भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी देवस्थान ट्रस्टने मुख, कळस व चरण दर्शन, तसेच देव्हारे व छबिना यासाठी बॅरिकेटसच्या माध्यमातून स्वतंत्र रांगांची सोय केली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. मंदिराकडे जाणाऱ्या चढणी व उतरणीसाठी नवीन पायऱ्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये गार्डनिंग करण्यात आले आहे.
मंदिर परिसरात विजेचे दिवे व खांब बसवून प्रकाशाने उजळला आहे. यात्रेच्या निमित्ताने रस्त्यावर परिसरात प्रसाद, हार, नारळ, ओटी, हळदी-कुंकू, खेळणी, उबदार कपडे, उपाहारगृह, देवीची महिमा सांगणाऱ्या कॅसेट, फोटो आदींची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर मंगलमय वातावरणाने फुलून गेला आहे. खासगी वाहने व एसटी बस यांच्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कंट्रोल रूमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वॉकी टॉकी
मंदिर परिसरात महाद्वार, पार्किंग या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
ट्रस्टतर्फे भाविकांसाठी अन्नदानाची सोय
ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी
खाद्य पदार्थ, मिठाई दुकानदारांची तपासणी
यात्रा काळात पशुहत्या, दीपमाळेत तेल टाकणे, तसेच झाडांवर लिंबू खिळे ठोकून केल्या जाणाऱ्या जादूटोणा प्रकारांना आळा घालण्यासाठी कर्मचाऱ्यांची विविध पथके लक्ष ठेवून आहेत. यात्रेच्या अनुषंगाने पशुसंवर्धन व पोलिस विभागाची पथके वाहनांची तपासणी करीत आहेत. जेणेकरून पशू व कोंबड्या यात्रेच्या ठिकाणी जाऊ नयेत, याची काळजी घेतली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.