Karad News : महिलांच्या सुरक्षेसाठी शहरातील सर्व ऑटोरिक्षांना क्यूआर कोड; शहर वाहतूक योजनेकडून अंमलबजावणी सुरू

महिलांच्या सुरक्षेसाठी शहरातील सर्व ऑटोरिक्षांना महिला सुरक्षा व सशक्तीकरणासाठी क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत.
PI Sandeep Suryavanshi
PI Sandeep Suryavanshisakal
Updated on

कऱ्हाड - महिलांच्या सुरक्षेसाठी शहरातील सर्व ऑटोरिक्षांना महिला सुरक्षा व सशक्तीकरणासाठी क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. त्याद्वारे महिलांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. त्यासाठी येथील शहर वाहतूक शाखेत रिक्षाचालकांनी तत्काळ अर्ज जमा करावेत, असे आवाहन कऱ्हाड (जि.सातारा) वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी केले आहे.

अनेकदा महिलांना रात्रीच्यावेळी प्रवास करताना असुरक्षित वाटते. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काही गैरप्रकार झाल्याच्याही घटना यापूर्वी घडल्या असून, त्यावरून गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर एखाद्या महिलेला तत्काळ पोलिसांची मदत मिळत नाही. त्यामुळे महिलांना आवश्यक त्यावेळी तत्काळ मदत मिळावी, या हेतूने परवानाधारक सर्व रिक्षांना क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत.

त्याची मोहीम शहर पोलिस वाहतूक शाखेने हाती घेतली आहे. त्याअंतर्गत रिक्षाचा नंबर, मालकाचे नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, रिक्षा थांब्याचे नाव, इंजिन नंबर, चेसीस नंबर आदी माहिती वाहतूक शाखेला देणे आवश्यक आहे. त्यासाठीची कार्यवाही शहर वाहतूक शाखेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी रिक्षाचालकांची बैठकही घेण्यात आली आहे. त्यामुळे सर्व ऑटो रिक्षामालक व चालक यांनी शहर वाहतूक शाखा कार्यालयात अर्ज जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी अशी केली जाईल कार्यवाही

कऱ्हाडच्या परवानाधारक रिक्षांना सध्या क्यूआर कोड लावण्याचे काम सुरू आहे. त्याद्वारे संबंधित रिक्षाची सर्व माहिती पोलिसांनी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. पुढील टप्प्यात महिलांनी माय टॅक्सी सेफ अॅपिलेकश डाऊनलोड करायचे आहे. त्यात ट्रेस माय लोकेशन, इमर्जन्सी कॉल, कंप्लेंट, रेटिंग असे ऑप्शन येतील.

एखादी महिला रात्री रिक्षात बसली आणि संबंधित क्यूआर कोड स्कॅन केला, तर सातारा कंट्रोल रूमला त्याचा अलर्ट जाईल. एखादा रिक्षा चालक संबंधित महिलेला चुकीच्या ठिकाणी घेऊन निघाला, काही त्रास दिला, गाडी चालवताना मोबाईलवर बोलत आहे, दारू पिऊन गाडी चालवत आहे, अपघात झाला आहे, गाडीत वस्तू विसरली आहे, याची माहिती संबंधित महिला त्या ॲपवरून पोलिसांना देऊ शकेल.

त्या महिलेने क्यूआर कोड स्कॅन केल्यावर त्या रिक्षाचे लाइव्ह लोकेशन ती महिला रिक्षातून उतरेपर्यंत दिसणार आहे. त्याचबरोबर महिला इमर्जन्सी कॉलही करू शकते. त्यामुळे तातडीने मदत मिळू शकते. त्याचबरोबर रिक्षाच्या सेवेबद्दल रेटिंगही देता येणार आहे.

महिला सुरक्षा व सशक्तीकरणासाठी सर्व ऑटो रिक्षांना क्यूआर कोड अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार लावण्यात येणार आहेत. त्यामुळे तातडीने सर्व ऑटो रिक्षा मालक व चालक यांनी शहर वाहतूक शाखा कार्यालयात माहिती भरलेले अर्ज जमा करावे.

- संदीप सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक, कऱ्हाड शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कऱ्हाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.