कारगिल भागात १९९९ मध्ये पाकच्या सैन्याने डोंगराच्या हद्दीत घुसखोरी केली होती. पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाण्यांवर कब्जा केला होता. त्यावेळी आमची पाच मराठा बटालियन फौज द्रास भागात तैनात होती. त्यावेळी मी सुभेदार पदावर कार्यरत असल्याने ४० जवानांचे नेतृत्व करत होतो.
आम्ही सर्व जवान देशाभिमान उराशी बाळगत पाकिस्तानी सैन्याशी निधड्या छातीने लढत एक-एक ठाणी जिंकत होतो... हा रोमांचकारी अनुभव सातारा तालुक्यातील राजापुरी गावचे व पाच मराठा बटालियनचे ऑनररी कॅप्टन मारुती लक्ष्मण मोरे (निवृत्त) यांनी दै. ‘सकाळ’शी बोलताना सांगितला.
कारगिल युद्धामध्ये मारुती मोरे सहभागी होते. ४० जवानांचे त्यांनी नेतृत्व केले होते. हा अनुभव सांगताना ते म्हणाले, ‘भारतीय सैन्य डोंगराच्या पायथ्याशी व पाक सैन्य उंच डोंगराळ भागात असल्याने भारतीय सैन्याला ठाणी जिंकताना अनेक अडचणी येत होत्या. त्यावेळी आम्हाला पाच किलोमीटर रेंज असलेली बंबारी करणारी हत्यारे देण्यात आली होती, तसेच पाच पॉइंट सहाची रायफल जवानांच्या हाती होती.
आमची बटालियनमधील जवान युद्धाच्या प्रसंगी विभागून ठेवण्यात आले होते. कारगिल व द्रासचा परिसर डोंगराळ व पहाडी असल्याने अशा प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानी सैन्याशी लढताना अनेक अडचणींचा सामना आम्ही निधड्या छातीने केला. त्या वेळी आमचा तुकडी द्रास परिसरातील घुमरी या ठिकाणी तैनात करण्यात आली होती.
शत्रूशी लढताना जोखीम पत्करून भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्याला टिपत होते. डोंगराळ व पहाडी भागात सैन्यासाठी जेवण उपलब्ध करण्यासाठी आर्मी सप्लाय बटालियनचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. परिसरात डोंगराळ भागात लहान-लहान हेलिपॅड तयार केले होते.
जेणेकरून, आठवड्यातून एकदा तरी हेलिकॉप्टरमधून जवानांना रेशन उपलब्ध होईल. अशा स्थितीत शत्रूशी लढत भारतीय सैन्य पाकच्या ताब्यातील एकेक ठाणी ताब्यात घेत होते. शेवटच्या टप्प्यात पाकिस्तान सैन्याने काबीज केलेली कारगिलसह सर्व ठाणी आपल्या जवानांनी २६ जुलैला ताब्यात घेऊन त्यावर तिरंगा फडकावला.
सेना मेडलने गौरव...
कारगिल युद्धात सहभागी असलेले मारुती मोरे यांना अतुच्य धाडसी कामगिरीबद्दल २००३ मध्ये सेना मेडलने गौरविले गेले. पूँछ सेक्टरमधील अराई गावालगत २९ सप्टेंबर २००१ मध्ये रात्री साडेनऊ वाजता मक्याच्या शेतात अतिरेकी लपून बसले होते. त्यावेळी मक्याच्या शेताला वेढा देऊन एके ४७ व रॉकेट लॉन्चरच्या साहाय्याने १७ राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीने सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडले. या तुकडीचे नेतृत्व ५ मराठा बटालियनचे ऑनररी कॅप्टन मारुती लक्ष्मण मोरे (निवृत्त) यांनी नेतृत्व केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.