आज काळ खूप बदलाय म्हणतात. गतिमान झालाय तो. 'मी आणि माझं' याच्या पलीकडे कोणी पाहतच नाही.
अण्णा, जाणिवांनी प्रगल्भ आणि संवेदनशील असणं, हा शाप आहे! त्यात वाचत राहणं आणि त्यामुळे इतिहास-वर्तमानातली विसंगती दिसणं, हे तर खूपच वाईट. सततची अस्वस्थता त्यामुळे वाट्याला येते. प्रा. शिवाजीराव भोसले म्हणायचे, ‘उमलत्या पिढीच्या हातात महापुरुषांची चरित्रे दिली पाहिजेत, म्हणजे हे दीपस्तंभ आदर्श समाज घडवतील.’पण, हल्ली महापुरुषांचे विचार सोईनं वापरण्याची पद्धत आली आहे. ताटात चवीपुरतं मीठ, तसं आयुष्यात अगदी थोडेच आदर्श. अलीकडे जाती शोधून महापुरुष फॉलो केले जातात. मग जातींच्या अस्मिता तीव्र होत जातात अन् विचारांची माती होते. आज काळ खूप बदलाय म्हणतात. गतिमान झालाय तो. 'मी आणि माझं' याच्या पलीकडे कोणी पाहतच नाही.
अण्णा, तुम्ही तुमचं सोडून सगळ्या समाजाचं त्या काळात का बरं पाहिलं? परवा विद्यापीठाची एक प्रवेश परीक्षा होती. कॉलेज गेटवर भयंकर गर्दी. पालक आपल्या मुलांना घेऊन आलेले. परीक्षेची वेळ झाल्यावर गेट उघडलं. परीक्षेचा नंबर शोधायला सगळ्यांची तारांबळ. कळपातनं चुकून एखादं पिल्लू कावरं-बावरं व्हावं, भरकटावं तसं एक साध्या कपड्यातलं पोरगं हातात परीक्षेचं रिसिट घेऊन नंबर शोधत आलं. त्याच्या पाठोपाठ मध्यम वयातला बऱ्यापैकी मध्यमवर्गीय गृहस्थ आपल्या मुलीला परीक्षेसाठी घेऊन आला.
मुलाला परीक्षा नंबरच सापडेना. त्याला घाबरून घाम फुटलेला. त्यांचं ओळखपत्र बघितलं तर तो गावाकडचा, अगदी छोट्या खेड्यातला. त्याला समजून सांगेपर्यंत मागून आलेल्या या गृहस्थांनी ‘त्याच सोडा, आमचं बघा’ म्हणून तगादा लावलेला. त्यांना म्हटलं, थोडं थांबा. परीक्षेला वेळ आहे अजून. याला नंबर शोधून देतो. तो ग्रहस्थ म्हणे, ‘ए मुला, तू जरा थांब परीक्षेला वेळ आहे अजून.’ सर, ‘त्याचं जाऊद्या, माझ्या मुलींचं आधी बघा. तिला एकदा जागेवर बसवलं की मी निश्चिंत.’मुलांना परीक्षेला बसवून माघारी फिरताना त्याला सहज विचारलं, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, कुठं? ‘अहो, मी शिक्षक नाही का?’ अमुक अमुक शाळेवर... मी स्तब्ध.
अण्णा, तुम्ही महाराष्ट्रभर पायी फिरायचा. शिक्षणासाठी खांद्यावर बसून लहान लहान पोरं साताऱ्याला आणायचा. ती ना तुमच्या जातीची असायची, ना नात्याची. पण, ती तुमची लेकरं म्हणून तुम्ही पोटाशी लावायचा. पण, अण्णा स्वतःच्या मुलाला आप्पासाहेबांना मात्र तुम्ही शिक्षणासाठी नातेवाईकांकडे ठेवलं होतं. स्वतःचं घर सोडून या महाराष्ट्राचा सामाजिक संसार मांडताना तुम्ही पोटच्या मुलांकडे क्षणभरही आसक्त झाला नाही. हे इतकं नि:स्वार्थ जगणं कसं जमलं तुम्हाला?
आज बघेल तिकडं फक्त स्वार्थ-स्वार्थ-स्वार्थ, त्रिवार स्वार्थ. कोरोनाची लस घ्यायला उभी असलेली रांग असो किंवा सरकारी ऑफिसच्या बाहेर कागदपत्रांसाठी उभी असलेली रांग. भयंकर हपापलेपणा. आपल्या कृतीत असलेली अर्थशून्यता आम्हाला का कळत नाही?
कोरोना काळात ऑनलाइन शिकवणं आणि वर्कफ्रॉम होम असताना शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्टीसाठी हट्ट करणं, हे सुद्धा तसं पाशवीच आहे. तुमच्यासारख्या महापुरुषांनी जगण्या-वागण्यातून उभे केलेले नैतिकतेचे उच्च आदर्श धडाधड जमीनदोस्त व्हायला लागलेत अण्णा. अण्णा, तुम्ही कवलापूरसारख्या खेड्यातनं गुडघ्या एवढ्या पांडुरंग पाटलाला खांद्यावर बसवून साताऱ्याला आणलं. इथेच मोठा केला आणि बॅरिस्टर करायला इंग्लंडला पाठवलं. तोच पोरगा बॅ. पी. जी. पाटील होऊन मोठ्या पगाराच्या नोकऱ्या, सुखी श्रीमंती परदेशी जीवन सोडून पुन्हा तुमच्या पायाशी आला. रयतेचा शिक्षक झाला. केवढी तत्त्वनिष्ठा होती ती.
मी शोधत असतो आज हे समाज घडवणारं शिक्षकाचं आत्मबळ. पण, नजर उपाशीच राहते. अण्णा वर्तमानात आरक्षणाचे प्रश्न भयंकर पेटलेत. तुम्ही रयतेचं पहिलं कॉलेज काढलं, त्याला नाव दिलं -छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. तुमच्या मनात महाराष्ट्र ऐक्य घडवणारं शिवरायांचं शिवतत्त्व होतं. त्याला फुले-शाहूंच्या वैचारिकतेचा भक्कम आधार देऊन महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांती विचारांच्या धाग्यांनी अण्णा तुम्ही महाराष्ट्राची सामाजिक समतेची वीण घट्ट केली. पण, आज तुमच्या या जातिअंताच्या-समतेच्या विचाराला पार मुठमाती दिली जातेय. समतेवर कोणी बोलतच नाही. अगदी शिक्षकही नाही. उलट सगळे जातीवर बोलतात. बघता बघता सगळे जातीयवादीच झालेत.
अण्णा तुम्ही लहान होता. मित्रांबरोबर खेळता-खेळता तुमच्या एका मित्राला तहान लागली. सार्वजनिक विहिरीवर त्याला कोणी पाणी पिऊ दिलं नाही. तुम्हाला या भेदाभेदाचा राग आला. त्या विहिरीचा तुम्ही रहाटच मोडून टाकला. अगदी नकळत्या वयात विषमतेवर प्रहार करणारा हा मानवतावाद तुमच्यात कुठून आला? पुढे गांधी हत्येनंतर समाजात जाळली जाणारी उच्चवर्णीयांची घरं तुमच्या रयतेतल्या पोरांनीच वाचवली. तुम्ही आयुष्यभर परिवर्तनाचं केवढं चाक फिरवलंत.
अण्णा हे चाक आज उलटं फिरायला लागलंय. आज अनुदानित, विनाअनुदानित शाळांचा बाजार समाजात दिसतोय. शिक्षणसुद्धा आधुनिक झालंय. पण, या सुटाबुटातल्या शिक्षणाला तुमच्या वटवृक्षाच्या छायेत पारावर भरणाऱ्या शाळेची सर नाही. ना तुम्ही शिकवलेलं मानवतेचं गीत. अण्णा, साताऱ्याच्या वसतिगृहात एका आड्याखाली रात्री राहिलेल्या शिळ्या भाकरीचे तुकडे पेढे म्हणून खाणारी आणि तुमच्या उबीला वाढलेली समता-बंधुता-स्वावलंबन या त्रिसूत्रीत घडलेली ती पिढी खरंच महान होती. समाजाच्या सर्व बाजूंनी अराजकतेचा भेसूरध्वनी कानी पडत असताना आम्हाला तुमच्याच विचारांकडे यावे लागेल. कारण तुम्ही घालून दिलेल्या वाटेनेच आमचे कल्याण आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.