खंडाळा : पुणे- बंगळूर महामार्गावरील खंबाटकी बोगद्यात रविवारी रात्री टॅक्टर ट्रॉली अडकल्याने तब्बल सहा तास पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. या ट्रॅफिक जामचा फटका आबालवृद्धांसह, खासदार संजय राऊत व आमदार मकरंद पाटील यांनाही सोसावा लागला. याबाबत महामार्ग पोलिसांनी सांगितले, की पुण्याकडे जाणाऱ्या खंबाटकी बोगद्यात उसाने भरलेली ट्रॉली अडकल्याने सुरुवातीला सिंगल लेनची वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, रविवार असल्याने वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहनांच्या पाच-सहा किलोमीटर रांगा लागल्या. यानंतर काही वाहन चालकांनी शिरगाव घाटातून वाठार- नीरामार्गे पुण्याला जाणे पसंत केले.
रात्री दहा वाजता खासगी क्रेनच्या साहाय्याने ही ट्रॉली काढण्यात आली. यावेळी वाहतूक पूर्णपणे थांबविल्याने भुईंज- पाचवडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पुण्या मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
या रांगेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत व त्यांचा ताफाही अडकून पडला, तर सायंकाळी सव्वाआठच्या सुमारास काही काळ आमदार मकरंद पाटील यांनाही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. दरम्यान रात्री वाहने अधिक काळ अडकून पडल्याने खासदार राऊत यांनी एका खासगी हॉटेलला थांबून जेवण करणे पसंत केले.
या वेळी वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागला, तर वयोवृद्ध व लहान मुलांनाही ताटकळत बसावे लागले. या वेळी महामार्ग पोलिसांनी तारेवरची कसरत करत रात्री दोन वाजता ही वाहतूक सुरळीत केली. या वेळी खंडाळा पोलिस निरीक्षक महेश इंगळे, महामार्ग सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुरव, स्वप्नील पोवार, अविनाश डेरे, सपकाळ, घनवट, कचरे, गायकवाड, सणस व फरांदे यांनी रात्रभर खडा पहारा देऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.