ज्या आजीनं मांडीवर प्राण सोडला, त्याच आजीच्या तिरडीवरुन 'नाना पाटील' पोलिसांना तुरी देत पसार झाले!

ज्या आजीनं मांडीवर प्राण सोडला, त्याच आजीच्या तिरडीवरुन 'नाना पाटील' पोलिसांना तुरी देत पसार झाले!
Updated on

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली, सातारा या परिसरात होते. नाना पाटलांवर प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेणे महत्त्वाचे ठरते. नाना पाटलांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले आहे. मात्र, अण्णा (नाना) त्यांच्या कार्यकाळात दुःख, संयम, चित्तथरारक या सर्व यातना पचवून अण्णांनी आपली 'फकिरी' जोपासली. अण्णांना आजीच्या निधनाचे अतिव दुःख झाले. एका क्रांतिकारकाच्या डोळ्यात अश्रू ओघळू लागले, भावना बांध फुटला. अनेकांना त्यांच्याकडे पाहताना गहिवरुन आले. आजीच्या निधनाने अण्णा पहिल्यांदाच ओक्साबोक्शी रडू लागले. पण, ज्या आजीनं मांडीवर प्राण सोडला, त्याच आजीच्या तिरडीवरुन 'क्रांतिकारक' पोलिसांना तुरी देत पसार झाले. मात्र, पोलिसांच्या हाती सापडलो तरी बेहत्तर, पण आजीची शेवटची भेट घ्यायचीच, असा निर्धारच अण्णांनी केला होता. 

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या आजीची तब्येत पूर्णपणे खालावली होती. मृत्यूचे आघात त्या बिचारीला सहन होत नव्हते. शेवटच्या दिवसांत तिने आपल्या लाडक्या नातवाच्या भेटीचा ध्यासच घेतला होता. मृत्यूपूर्वी दादांची म्हणजे नानांची व तिची भेट व्हावी, पण हे घडावे कसे? नानांवर सरकारचे पकड वॉरंट होते व पोलीस अहोरात्र त्यांच्या पाळतीवर होते. भूमिगत अवस्थेत असणाऱ्या अण्णांच्या कानावर आजीचा आजार व तिने घेतलेल्या ध्यासाची वार्ता गेली. अण्णांच्या हृदयात कालवाकालव सुरू झाली. तिचा आजींवर विलक्षण जीव होता, या विचारांनी त्यांना बेचैन केले. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की पोलिसांच्या हाती सापडलो तरी बेहतर, पण आजीची शेवटची भेट घ्यायचीच. त्यांनी सर्व पूर्व तयारी सुरु केली.

एक दिवस भल्या पहाटे निघून दिवस उजाडायच्या आत अण्णा घरात हजर झाले, सोबत त्यांचे साथीदारही होते. त्या सर्वांनी अत्यंत गुप्ततेने येण्याची योजना आखली होती. अण्णांना पाहताच घरादाराला आनंद झाला. ते धावतच आजीजवळ गेले व त्यांनी तिला हाक मारून आपण आल्याचे सांगितले. लाडक्या नातवाला पाहून आजीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तिने त्यांच्या गालावरून आपले थरथरते हात फिरवले. अण्णांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी आजीचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले. थोड्याच वेळात आजीने नातवाच्या मांडीवर प्राण सोडला. जणू याच क्षणाची ती वाट पाहात होती, असेच एव्हाना काही क्षण वाटून गेले.

गावात वेगळेच नाट्य सुरू झाले होते. कशी कोण जाणे पण अण्णा आपल्या साथीदारांसह आपल्या घरी आल्याची खबर पोलिसांना मिळाली. ते गावात येऊन त्यांनी वाड्यास वेढा दिला होता. पण, घराजवळ येताच आतील रडारड ऐकून ते बाहेरच थबकले. अशा प्रसंगी दांडगावा करून आत शिरणे अप्रशस्त होईल अथवा त्यामुळे एखादा अनावस्था प्रसंग ओढवेल अशी पोलिस अधिकाऱ्याची भावना झाली असावी. कदाचित, त्याच्यातली माणुसकीही जागी झाली असेल किंवा त्याने असाही विचार केला असेल की, सावज तर आता हाती आले आहेच, उगीच गडबड कशाला? एवढेच नव्हे तर आजीची अंत्ययात्राही काढावयास त्यांनी परवानगी दिली, हा सगळा प्रकार अण्णांच्या समोरच घडत होता. पण, तिथून निसटून परत जाणे तुर्तास शक्य नव्हते. आजीच्या निधनाचे दुःख आणि अण्णांच्या अटळ अटकेची चिंता अशा दुहेरी संकटाने सर्वांना घेरले होते. मृत्यू अटळ होता. पण, पोलिसांकडून होणारी अटक टाळणे हे अण्णांच्या व त्यांच्या यशवंत पुणदीकरसारख्या साथीदारांच्या बुद्धिचातुर्यावर अवलंबून होते. बुद्धिचातुर्याने त्यांना दगा दिला नाही. त्यांनी एक क्लृप्ती योजली. 

आजीची तिरडी तयार झाली. त्यावर आता अण्णांनी झोपावे व आजीचे प्रेत शेणीच्या पोत्यात बांधून गाडीतून स्मशानापर्यंत न्यावे असे ठरले. पण, अण्णांच्या आईला ही युक्ती पटेना. माझ्या लेकाला जिवंतपणी मी तिरडीवर बांधू देणार नाही, असा तिने पवित्रा घेतला. ती आक्रमक झाली. शेवटी तिच्याच लेकाच्या भल्यासाठी हे नाटक करावे लागणार आहे, अशी समजूत घालण्यात अण्णांचे साथीदार यशस्वी झाले. थोड्याच वेळात घरातून आजीची अंत्ययात्रा निघाली. सोबतची शेणीची गाडीही होती. अंत्ययात्रा स्मशानापर्यंत पोहोचली असेल नसेल तोवर पोलीस घरात शिरले. अण्णांचा शोध घेऊ लागले. पण, अण्णा त्यांना कुठेच दिसले नाहीत. सर्व बाजूंनी कडेकोड बंदोबस्त करूनही नाना पाटील कसे निसटले हे त्यांना फार उशिरा समजले, पण तोवर उशिरच झाला होता.

हा प्रसंग म्हणजे दुःख, संयम, चित्तथरारक घटना यांचे जिवंत मिश्रण आहे. यातल्या सर्व यातना पचवून अण्णांनी आपली फकिरी जोपासली. फकिरीला धक्का लागू दिला नाही. पुन्हा घराच्या मायापाशात ते जराही गुंतले नाहीत. १९३६ साली त्यांनी आपली बहीण गंगूबाई हिचे लग्न कुंडलाचे एक कार्यकर्ते श्री. नाथाजी लाड यांच्याशी आयोजित केले. नाथाजी पुढे १९४२ च्या प्रतिसरकारातले एक प्रमुख कार्यकर्ते बनले. हे लग्न गांधी पद्धतीने अवघ्या १५ रुपये खर्चात झाले. १९४० साली कन्या हौशाताईंचे लग्न खानापूर तालुक्यातील हणमंत वडियेचे श्री. भगवानराव पाटील यांच्याशी झाले. तेही गांधीपद्धतीने होऊन फक्त २० रुपये खर्चात पार पाडले गेले. भगवानराव पाटीलही पुढे प्रतिसरकारचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून पुढे आले. या घरच्या लग्नांच्या बाबतीतच सर्व रूढींना फाटा देऊन, स्वातंत्र्य चळवळीशी नाते जोडून आणि कमीत कमी खर्च करून गांधी लग्ने' लावण्याची रीत क्रांतिसिंहांनी स्वतः आचरणात आणून दाखवली. मग त्यांनी ती जगाला सांगितली. अशी लग्ने शेकडोंच्या संख्येने सातारा जिल्ह्यात लावली गेली. त्यामुळे माणसे स्वातंत्र्य चळवळीशी जोडली गेली, अंधश्रद्धा आणि ब्राहमण्यवादी रूढीपासून मुक्त झाली.

या लग्नात हुंडा, वाजंत्री, घोडा, बाशिंग या सर्व गोष्टींना फाटा दिला जाई. वधू-वरांना नवे खादीचे कपडे आणि एकमेकांना घालण्यासाठी सुताचे दोन हार यासाठी जेवढा लागेल तेवढाच खर्च या लग्नाला यायचा. जमलेल्यांनी स्वातंत्र्य चळवळीतली गाणी आणि मंगलाष्टका म्हटल्या की काम भागायचे. अशी लग्न पद्धती, जातिव्यवस्थेला विरोध करणारी, बिनखर्चाची, ब्राह्मण्याला सोडचिठ्ठी देणारी, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुकारा करणारी, सर्वांना शिक्षण देण्याची शपथ घेणारी प्रथम महात्मा फुलेंनी सुरू केली. सत्यशोधक लग्न पद्धती' म्हणून पुढे आणली. क्रांतिसिंहांनी सुरुवातीच्या (१९२० पासून १९३० -३२ पर्यंतच्या) काळात याच पद्धतीचा प्रसार केला. नंतर गांधी लग्न' म्हणून जास्त मोठ्या प्रमाणात प्रचारात आणले. ही दोन लग्ने झाल्यावर तर अण्णा १०१ टक्के फकीर झाले. क्रांतिकारी परिवर्तनासाठी त्यांनी पायाला भिंगरी बांधून भ्रमण सुरू केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी ही क्रांतिकारी फकिरी अभिमानाने आणि निष्ठेने पाळली. म्हणूनच ते क्रांतिसिंह झाले. पण, अशी फकिरी पत्करण्याच्या आधी त्यांनी ही महत्त्वाची ग्रहस्थी कर्तव्येही आपल्या सामाजिक तत्त्वांना बाधा न आणता पार पाडली. त्या आधी स्वतःचे लग्न झाल्यावर सत्यशोधक तत्त्वाप्रमाणे पत्नीला बरोबरीने वागवले. हीच अण्णांची खासियत संपूर्ण महाराष्ट्र जाणतो आहे आणि क्रांतीकाराला अनुभवतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.