सातारा - शासनाच्या लाडकी बहीण योजनेला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ऑनलाइन दहा हजार महिलांनी नोंदणी केली आहे, तसेच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून शहरी भागातील १७००, तर ग्रामीण भागात चार हजारांवर नोंदणी झाली आहे.
ही नोंदणी करताना सेतू किंवा इतर कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. महिला नारीशक्ती दूत ॲपवर नोंदणी करून आपली आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकते. त्यासाठी अंगणवाडी सेविकांची ही मदत महिलांना घेता येणार आहे.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील एक अविवाहित महिला यांना लाभ घेता येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात सध्या घरोघरी जाऊन नोंदणी करण्याचे व नारीशक्ती दूत ॲपवर नोंदणी केली जात आहे. या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सातारा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, यांच्या पथकांच्या माध्यमातून ५० कुटुंबांसाठी एक पथक याप्रमाणे घरोघरी जाऊन नोंदणी केली जात आहे. त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेही नोंदणीवेळी ॲपवर अपलोड केली जात आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील दहा हजार महिलांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी झाली असून, त्यापेक्षाही जास्त ऑफलाइन नोंदणी झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे, तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून शहरी विभागात १७०० महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे, तर ग्रामीण भागात चार हजार महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
महिलांना कोणत्याही सेतू, इतर कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने महिला स्वत: नोंदणी करू शकतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे मोबाईल ॲपवर अपलोड करावी लागणार आहेत, ती उपलब्ध करूनच नोंदणी करावी लागणार आहे.
आढावा समिती स्थापन...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संनियंत्रण आणि आढावा घेण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर समिती स्थापन केली आहे. जिल्हास्तर समितीचे पालकमंत्री अध्यक्ष असून, जिल्ह्याचे मंत्री सहअध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, सहआयुक्त नगर प्रशासन तसेच पालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी हे सदस्य असतील, तर जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतील. हे सर्व या नोंदणीवर लक्ष ठेऊन राहणार आहेत.
दृष्टिक्षेपात
नोंदणीसाठी सेतू किंवा इतर कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.
महिला नारीशक्ती दूत ॲपवर नोंदणी करून आपली आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येते.
५० कुटुंबांसाठी एक पथक याप्रमाणे घरोघरी जाऊन नोंदणी सुरू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.