Satara Lok Sabha Constituency : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू केली आहे. मात्र, तरीही सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच उमेदवारीवरून ट्विस्ट निर्माण झाले आहे. दरम्यान, उमेदवार कोण असणार?
यावरच कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील राजकीय गणिते अवलंबून असतील. कऱ्हाड उत्तरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती सध्या मजबूत आहे. मात्र, त्याला आव्हान देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना,
उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने जोरदार तयारी केली आहे. मात्र, उमेदवारच जाहीर न झाल्याने राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि मतदारही संभ्रमात आहेत. त्यामुळे उमेदवार कोण असणार? यावरच विजयाची गणिते अवलंबून असतील, हे नक्की.
- हेमंत पवार
कऱ्हाड उत्तर हा ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून घड्याळाचे काटे योग्य दिशेने फिरवून विरोधकांचे बारा वाजवत हा मतदारसंघ ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील यांनी अभेद्य ठेवला.
मात्र, त्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपने मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वतंत्र गटांची विधानसभा मतदारसंघात विभागणी झाली आहे.
मात्र, कऱ्हाड उत्तरचे आमदार पाटील हे खासदार पवार यांच्या पाठीशी आहेत. त्यांनीही मतदार संघातील प्रत्येक गावात संपर्क ठेऊन गटातील एकही मतदार फुटणार नाही, यासाठी तयारी केली आहे. अजित पवारांची ताकद भाजपच्या पथ्यावर पडेल, या आशेतून विकास कामांच्या माध्यमातून पाळेमुळे घट्ट करत या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपनेही मोटबांधणी केली आहे.
भाजपने या मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या मदतीने निधी आणून विकासकामे करण्याचा सपाटा लावला आहे.
त्याचबरोबर सातत्याने उत्तर मतदारसंघात भाजपचे नेते, मंत्री आणून वातावरण निर्मिती करण्याचे काम सुरू केले आहे. त्या माध्यमातून भाजपचे जिल्हाध्यक्षपदही कदम यांनी पटकावले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील हे या मतदारसंघातीलच आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे गटाचेही पदाधिकारी या मतदारसंघात आहेत. त्यांची ताकदही हळूहळू वाढत आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे किती वजन? हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट होईल.
अर्ज दाखल करण्यास अद्याप वेळ असला, तरी अद्याप सातारा लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. हा मतदारसंघ कोणाला? यावर एकमत होत नसल्याने उमेदवारी निश्चिती लांबली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांसह मतदारही संभ्रमात आहेत.
ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल, त्याचवेळी उत्तर मतदारसंघातील पत्ते खुले होऊन निवडणुकीत रंग भरेल. दरम्यान, भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे.
मात्र, भाजपकडून उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर झाल्या, तरीही खासदार भोसलेंचे नाव नसल्याने उत्तरेतील त्यांचा गट अस्वस्थ आहे. राष्ट्रवादीकडून (अजित पवार) जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे.
त्यामुळे उत्तरेतील अजित पवार गटाचे पत्ते त्या गटाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यावर ओपन होतील, अशी स्थिती आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षानेही अद्याप उमेदवार जाहीर केली नाही. खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा आहे.
आमदार बाळासाहेब पाटील यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना उमेदवारी देण्याची मागणी खासदार पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे उत्तरेतील आमदार पाटील गट हा उमेदवारी कोणाला मिळणार, यासाठीही वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे.
कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार बाळासाहेब पाटील यांचा गट सद्यःस्थितीत मजबूत आहे. त्या मतदारसंघात जरी महायुतीने कंबर कसली असली, तरी सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून आमदार पाटील या मतदारसंघातील चारही तालुक्यांत संपर्क ठेऊन आहेत. त्यामुळे जर खासदार पाटील यांना शरद पवारांकडून उमेदवारी मिळाली, तर आमदार पाटील यांची भूमिका काय राहणार? याचीही उत्सुकता मतदारांना आहे.
कऱ्हाड उत्तर मतदारसंघात काँग्रेसचा गटही कार्यरत आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या माध्यमातून काँग्रेसचा गट कार्यरत आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये काँग्रेसमधील गट हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर राहील, अशी स्थिती आहे. मात्र, उमेदवार कोण असणार? यावरही पुढील गणिते अवलंबून आहेत.
- लोकसंख्या - चार लाख २३ हजार ९३१
- मतदार संख्या - दोन लाख ९३ हजार १५४
- एकूण मतदान केंद्रे - ३३८
- सहाय्यकारी मतदान केंद्र - एक
- दिव्यांगांसाठीची मतदान केंद्र - एक हजार एक
- संवेदनशील मतदान केंद्र - एक
- सैनिक मतदारांची संख्या- दोन हजार ४४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.