Sharad Pawar : माणसाठी ‘मविआ’तर्फे एकच उमेदवार द्या; निवडून आणायची जबाबदारी माझी

माणच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी एकच उमेदवार द्या. निवडून आणायची जबाबदारी माझी असेल.
Sharad Pawar
Sharad PawarSakal
Updated on

गोंदवले/दहिवडी - माणच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी एकच उमेदवार द्या. निवडून आणायची जबाबदारी माझी असेल, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. दुष्काळी माणच्या पाणीप्रश्नासाठी मंत्रिपद नाकारणारा नेता म्हणजे धोंडिराम वाघमारे होते, अशा शब्दांत त्यांनी गौरवोद्‌गार यावेळी काढले.

वडजल (ता. माण) येथील माजी आमदार (कै.) धोंडिराम वाघमारे यांच्या स्मारकाचे व अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, उत्तमराव जानकर, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, रणजितसिंह देशमुख, सुनील माने, कविता म्हेत्रे, निर्मला वाघमारे, विलासराव माने, सयाजी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.माजी आमदार (कै.) धोंडिराम वाघमारे यांच्या ‘हुंदका’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

शरद पवार म्हणाले, ‘माणदेशी हा आगळावेगळा प्रदेश असून, देशाच्या कानाकोपऱ्यात माणदेशी माणूस आहे. परिस्थितीवर मात करून जगणारी ही माणदेशी माणसं आहेत. मला ऊर्मी देणाराही माणदेशच आहे. माणदेशी माणसं अशक्य ते शक्य करून दाखवतात. माणदेशाशी आमची नाळ जुळलेली आहे.

माजी आमदार वाघमारे यांनी सातत्याने फक्त पाण्याची मागणी केली होती. पाण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. राजकारणात अनेक गोष्टी करता येतात; परंतु काहीजण काहीच करत नाहीत. आमच्या भागाला फक्त पाणी द्या, अशी अट घालून मंत्रिपद नाकारणाऱ्या माजी आमदार वाघमारे यांना माणचे लोक विसरले नाहीत.’

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, ‘माण मतदारसंघासाठीच्या पाणी योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न वाघमारे यांनी केला. ते माणच्या जनतेसाठी झटणारे नेते होते. माणची जनता स्वाभिमानी असून, शरद पवार यांच्यावर प्रेम करते. शरद पवार यांचे हात बळकट करा.’

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘माणमध्ये पाणी यावे, यासाठी योगदान देणाऱ्यांपैकी वाघमारे होते. माझ्या भागाला पाणी देण्यासाठी सरकारला पाठिंबा देणारा नेता म्हणजे धोंडिराम वाघमारे. त्यांचा वारसा वाघमारे कुटुंबीयांनी चालवावा.’

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘या भागातील प्रश्न कायमचे सुटावेत म्हणून माजी आमदार धोंडिराम वाघमारे यांनी प्रयत्न केले. यशवंतराव चव्हाण यांचे विचार माण मतदारसंघात उतरवण्याचे काम त्यांनी केले.’

उत्तमराव जानकर म्हणाले, ‘सर्व क्षेत्रात माणची माणसं आहेत. राजकारणात बदल घडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून यावेळी माणमध्ये करेक्ट कार्यक्रम करून दाखवू.’

प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘धोंडिराम वाघमारे यांनी उरमोडी जिहे कठापूर योजना व आंधळी तलावासाठी प्रयत्न केले. माण तालुक्याशी प्रामाणिक असणारा नेता म्हणून नावाजलेले होते. सध्याचे लोकप्रतिनिधी स्वतःचे उदो उदो करत आहेत.’

अभयसिंह जगताप, अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, डॉ. शिवाजी गावडे, निर्मला वाघमारे यांचीही यावेळी भाषणे झाली. अभय वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र शेलार यांनी सूत्रसंचालन केले.

दादांचा विसर का?

माजी आमदार वाघमारे यांनी दहा वर्षांत काहीच केलं नाही का? असा सवाल उपस्थितांना करून अभय वाघमारे म्हणाले, ‘सध्या राजकारणात त्यांचे साधं नावही घेतलं जातं नाही. धोंडिराम दादांचा माण तालुक्याला विसर पडला; परंतु शरद पवार यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.