स्वच्छ सर्वेक्षणात महाबळेश्‍वरला नववे स्थान, कचरामुक्तीत थ्री स्टार मानांकन

Satara
Satara
Updated on

महाबळेश्वर (जि. सातारा) : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत "स्वच्छ सर्वेक्षण 2020' स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये येथील पालिकेने पश्‍चिम विभागात देशात दहावे, तर राज्यात नववे स्थान पटकावले. कचरामुक्त शहरांच्या यादीमध्ये पालिकेने केंद्र शासनाचे तीन तारांकित (3-स्टार) मानांकन प्राप्त केले असून, हागणदारीमुक्त (ओडीएफ++) शहर म्हणून मानांकन प्राप्त केले आहे. 

पालिकेने "स्वच्छ सर्वेक्षण 2018'च्या सर्वेक्षणात पश्‍चिम विभागातील नॉन- अमृत प्रवर्गात महाबळेश्वरने 11 वा गुणानुक्रम पटकावला होता, तर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्येदेखील पालिकेने उल्लेखनीय कामगिरीबद्दल नॉन अमृत प्रवर्गात राष्ट्रीय पातळीवर आठवा गुणानुक्रम मिळवलेला होता. पालिकेने स्वच्छतेबाबत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशासह राज्यातील मोजक्‍या पालिकांत मानांकन मिळवून मार्च 2019 मध्ये दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, स्वच्छ भारत मिशनचे संचालक व्ही. के. जिंदाल, केंद्रीय आवास आणि विकासमंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय सचिव दुर्गा शंकर मिश्रा, तसेच नगरविकासच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले होते. 

भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विभागामार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दर वर्षी घेतल्या जाणाऱ्या "स्वच्छ सर्वेक्षण' या देशपातळीवर होणाऱ्या स्पर्धेमध्ये महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिका पुन्हा एकदा आपले स्थान कायम करण्यात यशस्वी ठरली असून, "स्वच्छ सर्वेक्षण 2020' या स्पर्धेमध्ये पालिकेला पश्‍चिम विभागात देशात दहावे, तर राज्यात नववे स्थान पटकावत स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत तीन तारांकित (3-स्टार) कचरामुक्त शहर, हागणदारीमुक्त शहर (ओडीएफ++) म्हणून नामांकने प्राप्त केले आहे. केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी नुकतीच दिल्ली येथे या स्पर्धेच्या पुरस्कारांची घोषणा केली, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे "स्वच्छता महोत्सव' या सोहळ्यादरम्यान ऑनलाइन माध्यमातून निकाल जाहीर केला आहे. 

महाबळेश्वर पालिकेच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नगराध्यक्षा स्वप्नाली कुमार शिंदे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे- पाटील, नगरसेवक, नगरसेविका, पालिका अधिकारी, कर्मचारी, प्रामुख्याने स्वच्छता विभाग, महिला बचतगटांच्या स्वच्छता दूत महाबळेश्वरकर नागरिक यांनी दिलेल्या योगदानामुळे हे यश मिळाल्याचे सांगून सहकार्याबद्दल महाबळेश्वरवासियांचे आभार मानले. 


स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही सातत्य राखल्याचा अभिमान नक्कीच आहे. मात्र, महाबळेश्वर शहर हे भारतामधील एक नामांकित असे पर्यटनस्थळ असून, आपल्या या शहराची प्राथमिकता "स्वच्छता'च असली पाहिजे, शहरात स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करू शकलो याचा सार्थ अभिमान वाटतो. 

-स्वप्नाली शिंदे, नगराध्यक्षा, महाबळेश्वर पालिका 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.