जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठीचे मतदान झाल्यानंतर सर्वांच्याच नजरा मतमोजणीकडे लागल्या होत्या. शनिवारी मतमोजणी सुरू झाली अन् निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे समर्थक, पाठीराखे, कार्यकर्त्यांमधील धाकधूक, हुरहूर वाढीस लागली. फेरीनिहाय निकालाचे कल जाहीर होऊ लागल्यानंतर जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाच्या उधळणीत जल्लोष केला.
सातारा : सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक पहिल्यापासूनच एकतर्फी असल्याचा दावा आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या समर्थकांकडून करण्यात येत होता. हा दावा करत असतानाच प्रत्येकजण शिवेंद्रसिंहराजेंचे मताधिक्य लाखांच्या पुढे राहील, असे छातीठोकपणे सांगत होता. मतदानानंतर या दाव्यांना अधिकच बळ येत गेले.