सातारा : महाराष्‍ट्र केसरीच्‍या दंगलीची धांदल

साताऱ्यात मल्‍लांची वैद्यकीय तपासणी
Maharashtra Kesari competition will held in Satara
Maharashtra Kesari competition will held in Sataraesakal
Updated on

सातारा : येथे होत असलेल्‍या महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेसाठी राज्‍यभरातील ४५ संघांच्‍या माध्‍यमातून ९०० मल्‍ल सहभागी झाले असू्न या मल्‍लांची आज वैद्यकीय तपासणी आणि वजन नोंदी घेण्यात आल्या. ही प्रक्रिया पार पडल्‍यानंतर उद्‌घा‍टनानंतर सामना आयोजकांनी ठरविलेल्‍या वेळापत्रकानुसारच्‍या वजनी गटातील मल्‍लांनी एकमेकांची ताकद आजमावत माती आणि गादी प्रकारातील आखाड्यात शड्डू ठोकत कुस्‍त्‍या लढल्‍या.

राज्‍य कुस्‍तीगीर परिषदेच्‍या मान्‍यतेनुसार साताऱ्यात आजपासून (ता. ५) महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धा होत आहे. शनिवारी (ता. ९) अंतिम लढत होणार आहे. या स्‍पर्धेसाठी राज्‍यभरातील नोंदणीकृत तालीम संघांकडून पात्र मल्‍लांच्‍या याद्या मागविण्‍यात आल्‍या होत्‍या. त्यानुसार ४५ संघांनी ९०० पात्र मल्‍लांना या स्‍पर्धेसाठी पाठवले आहे. हे संघ आज सकाळी आपल्‍या संघाचे प्रतिनिधित्‍व करत जिल्‍हा क्रीडा संकुलात दाखल झाले. या संघांत असणाऱ्या मल्‍लांच्‍या नोंदी घेतल्‍यानंतर त्‍यांची वजन आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया हाती घेण्‍यात आली. त्यासाठीची स्‍वतंत्र व्‍यवस्‍था उभारण्‍यात आली होती.

वजन आणि वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्‍यानंतर स्‍पर्धेसाठी आलेल्‍या विविध वजन गटांतील मल्‍लांच्‍या कुस्‍तीसाठीच्‍या जोड्या लावण्‍याचे काम संयोजकांनी सुरू केले. त्यानुसार उद्‌घाटनानंतर होणाऱ्या कुस्‍त्‍यांसाठी मल्‍लांची यादी अंतिम करण्‍यात आली. या स्‍पर्धेच्‍या निमित्ताने राज्‍यभरातील मल्‍लांच्‍या कुस्‍तीगीरीतील डाव-प्रतिडावांची दंगल सातारकरांना पाहावयास मिळणार असून त्‍यानिमित्ताने तालीम संघासह राज्‍य कुस्‍तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

डॉक्‍टरांसह शिक्षक तैनात

स्‍पर्धेसाठी येणाऱ्या मल्‍लांची वैद्यकीय तपासणी करण्‍यासाठी जिल्‍हा रुग्‍णालयातील डॉक्‍टरांचे पथक तैनात करण्‍यात आले होते. या पथकाने वैद्यकीय तपासणी केल्‍यानंतर मल्‍लांना वजन नोंदीसाठी पाठविण्‍यात येत होते. त्याठिकाणी वजन नोंदी घेण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेचे शिक्षक नेमण्‍यात आले होते. या शिक्षकांना त्‍यासाठीची तांत्रिक मदत करण्‍यासाठी राज्‍य कुस्‍तीगीर परिषदेचे सदस्‍य आणि स्‍वयंसेवकही कार्यरत होते.

पंचांचा उजळणी वर्ग

या स्‍पर्धेदरम्‍यान निकाल आणि गुण पद्धतीवरून वाद होऊ नये, यासाठी आंतरराष्‍ट्रीय मानांकनानुसार ठरविण्‍यात आलेल्‍या नियमांची माहिती पंचांना देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. त्यानुसार सकाळच्‍या टप्‍प्‍यात स्‍पर्धेत पंच म्‍हणून काम करणाऱ्यांना नियमांतील बदल, आंतरराष्‍ट्रीय निकष आणि इतर तांत्रिक बाबींची माहिती तोंडी तसेच पॉवर पॉइंट पद्धतीने देण्‍यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.