रहिमतपूर : शिंदे- फडणवीसांचे सरकार हे स्थगिती सरकार आहे. राज्याच्या हितासाठी आवश्यक असणाऱ्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. राज्यातून अनेक प्रकल्प स्थलांतरित होत आहेत.
वाढत असलेली बेरोजगारी, महागाई याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांचे फक्त ४० आमदारांवर लक्ष आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. धामणेर ग्रामपंचायत प्रशासकीय इमारत आणि विकास सेवा सोसायटी नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सभापती, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. धामणेर ग्रामस्थांनी गुढ्या उभारून पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी किरोली गावातील ग्रामस्थांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. याप्रसंगी अजित पवार यांनी विविध विषयांवर फटकेबाजी करत पक्षातील पुढाऱ्यांनाही कानपिचक्या दिल्या.
पवार म्हणाले, ‘‘राज्यातील ३६ जिल्ह्यांत फक्त २० मंत्री आहेत. सहा महिन्यांत एकही महिला मंत्री राज्य सरकारला मिळाली नाही. एक आमदार पाच-पाच मंत्रिपदे घेऊन काम पाहात आहे. जेवढे मंत्री जास्त तेवढ्या गतीने राज्याचा कारभार चालू शकतो. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेच कारभार चालवू पाहात आहेत.
राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित न करता फक्त चाळीस आमदारांवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. दीड- दोन लाख युवकांना रोजगार मिळणारे उद्योगधंदे राज्याबाहेर गेले. दिल्लीतून काय आणले? महागाई, बेरोजगारी कमी होईना. राज्यपाल वाचाळ विरांसारखे बोलत आहेत. इतिहासाची मोडतोड सुरू आहे. राज्यात धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचे व स्वतःची पोळी भाजण्याचे काम काही पक्षांकडून सुरू आहे. विकासकामांना स्थगिती देण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. विकासकामे ही कोणत्या पक्षाची नसून जनहिताची असतात.’’
पक्षासाठी काम करा
विधानसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला कसा? हे मला कळत नाही. कोणाला काही मिळाले, काही नाही मिळाले याचा विचार न करता पक्षासाठी काम करण्याची सूचना अजित पवार यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.