दहिवडी - माण पंचायत समिती आरक्षण सोडतीत मलवडी गण जैसे थे राहिला असून अन्य ठिकाणी महिलांच्या आरक्षित जागा खुल्या तर खुल्या जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. मलवडी वगळता विद्यमान सदस्यांची गोची झाली आहे. मात्र, बिदाल, वावरहिरेत कारभाऱ्यांना संधी उपलब्ध झाली आहे. माण पंचायत बचत भवनात सकाळी अकरापासून प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी आरक्षण सोडत काढली. गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील उपस्थित होते.
राजकीयदृष्ट्या जागरुक व चर्चेत असलेला कुकुडवाड गण अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला. त्यामुळे तानाजी काटकर, संजय जाधव, गणेश काटकर यांसह अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळे आता उमेदवाराची शोधाशोध करण्यासाठी नेत्यांची धावपळ होणार आहे. मार्डी गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी असून तेथे सध्या इच्छुक दिसत नाहीत. आंधळी गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला. त्यामुळे आंधळी, महिमानगड, पिंगळी बुद्रुक येथून इच्छुकांमध्ये चढाओढ लागणार आहे.
गोंदवले बुद्रुक, वरकुटे मलवडी, पळशी गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने तेथे नवीन चेहरे समोर येऊ शकतात. मलवडी, बिदाल, वावरहिरे, वरकुटे म्हसवड गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने याठिकाणी इच्छुकांच्या आकांक्षांना धुमारे फुटले आहेत. मलवडीत विद्यमान सदस्य विजयकुमार मगर, दादासाहेब जगदाळे, बाळासाहेब कदम, रमेश शिंदे, हणमंत मोहिते हे उमेदवारीसाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. बिदालमध्ये विक्रमसिंह भोसले, तानाजी मगर, एम. के. भोसले, संजय भोसले तर वावरहिरेत हरिश्चंद्र जगदाळे, सतीश जगदाळे, राजेंद्र कदम, चंद्रकांत वाघ हे इच्छुक असण्याची शक्यता आहे. वरकुटे म्हसवड गणात श्रीराम पाटील, बबन वीरकर हे मैदानात असू शकतात.
आरक्षण स्थिती...
मलवडी - सर्वसाधारण
आंधळी - नागरिकांचा मागास प्रवर्ग
बिदाल - सर्वसाधारण
वावरहिरे - सर्वसाधारण
मार्डी - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
वर म्हसवड - सर्वसाधारण
गोंदवले - सर्वसाधारण स्त्री
पळशी - सर्वसाधारण स्त्री
कुकुडवाड - अनुसूचित जाती स्त्री
वर मलवडी - सर्वसाधारण स्त्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.