महाबळेश्वर : देशातील पहिले मधाचे गाव म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील मांघर या गावाचे नाव लवकरच जाहीर केले जाणार आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज मांघर या गावाला भेट देऊन तेथील मध उद्योगाची पाहणी केली. ग्रामस्थ व मधपाळांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. मांघर हे गाव आदर्श गाव असून, गावाने निर्मलग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान पुरस्कार, पर्यावरण विकास रत्न पुरस्कार, एक गाव एक गणपती पुरस्कार व लोकग्राम पुरस्कार असे अनेक पुरस्कार पटकाविले आहेत.
आता या गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. मांघर हे गाव आता देशातील पहिले मधाचे गाव ठरणार आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मांघरला भेट देऊन तेथील मध उत्पादनाची माहिती घेतली.दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वरला हिरडा विश्रामगृहात बैठक झाली. या वेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, गट विकास अधिकारी अरुण मरभळ, खादी ग्रामोद्योगचे संचालक वसंत पाटील व विस्तार अधिकारी सुनील पार्टे आदी उपस्थित होते. मांघर गावाबाबत वसंत पाटील यांनी माहिती दिली. या गावात घरटी मधाचे उत्पादन घेतले जाते. प्रत्येक घरात मधपाळ आहेत. जिल्ह्यातील एकूण मधाच्या उत्पादनापैकी दहा टक्के उत्पादन या गावात होते, असे सांगून या गावात कोणकोणते प्रकल्प राबविले जातील. याचा आराखडा पाटील यांनी सादर केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी मांघरला भेट देऊन राजेंद्र चोरगे या मधपाळाच्या घरी भेट देऊन मधपाळांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे मधपेट्यांचे नुकसान झाल्याची माहिती या गावातील मधपाळांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. गावाच्या वतीने पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. या वेळी मांघरच्या सरपंच शीला जाधव, महादेव जाधव, गणेश जाधव, बबन जाधव, विजय जाधव, विठ्ठल जाधव, रमेश जाधव, मारुती चोरगे आदी उपस्थित होते.
पर्यावरणाशी तडजोड नको : शेखर सिंह
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘‘पर्यटनाची संकल्पना आता बदलली आहे. शहरात मिळते ते पाहण्यासाठी येथे कोण येणार नाही. त्यांना काहीतरी वेगळे हवे आहे. लोकांना आता नैसर्गिक व पारंपरिक पाहण्याची आवड आहे. ते तुम्ही द्या. निसर्गाला हात लावू नका. पर्यावरणाशी तडजोड करू नका. जंगलाचे जतन आणि संवर्धन करा.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.