भीवसुळा नैसर्गिक गुहांचा भुलभुलैय्या

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत बंदिस्त असलेला असाच एक चमत्कार म्हणजे भीवसुळा गुहा
maze of natural caves in Bhiwasula satara tourism
maze of natural caves in Bhiwasula satara tourismsakal
Updated on

सातारा : सह्याद्रीच्या पोटात अनेक रहस्य आणि चमत्कार दडलेले आहेत. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत बंदिस्त असलेला असाच एक चमत्कार म्हणजे भीवसुळा गुहा. किर्रर्र जंगलानं वेढलेल्या परिसरात अंगावर काटा आणणाऱ्या नैसर्गिक गुहांचा भुलभुलैय्या असं भिवसुळा गुहांचं वर्णन करता येईल. प्रत्येकाने या ठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी.कसे जाल? : पाचगणी-महाबळेश्वर मार्गावर पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या ''भिलार'' गावापासून तीन किलोमीटरवर कासवंड हे गाव लागतं. या गावातच भिवसुळा हे ठिकाण वसलेलं आहे. कासवंड येथील चोरमले वस्तीपर्यंत आपण वाहनांनी जाऊ शकतो. तिथून पुढे मात्र आपल्याला पायी जावं लागतं.

‘सडा’ : पाच ते दहा मिनिटांच्या चढाईनंतर आपण एका विस्तीर्ण अशा सपाट पठारावर जाऊन पोचतो, ज्याला स्थानिक लोक ''सडा'' असं म्हणतात. सुमारे ७० एकरांवर वसलेलं हे मैदान पाचगणीच्या टेबल लँडएवढं विस्तीर्ण असून, त्याची उंची महाबळेश्वरमधील सर्वांत उंच ठिकाण असलेल्या विल्सन पॉइंटइतकीच आहे. या पठारावरून जावळी खोरं, गुलाब पॉइंट, वैराटगड, टेबललँड, मांढरदेवी, पांडवगड, कमळगड आदी ठिकाणं आपल्या नजरेच्या टप्प्यात येतात.

जैवविविधता : येथे बिबट्या, माकड, डुक्कर, तरस, साळिंदर व मोर पाहावयास मिळतात. रानमेवा करवंदासह गेळा, तोरण ही वैशिष्ट्यपूर्ण झाडंही इथे पाहायला मिळतात. इथे आढळणाऱ्या रामेटा वेलीचा उपयोग पूर्वी वैद्य मोडलेलं हाड बांधायला करत.

भीवसुळा गुहा : निसर्गाशी एकरूप होत थोडं अंतर चालल्यानंतर आपण भिवसुळा गुहांकडे पोचतो. या गुहा भूकंपामुळे तयार झाल्या असाव्यात, असं जाणकार सांगतात. काळ्याकुट्ट कातळ खडकाच्या सानिध्यात अनेक छोट्या-मोठ्या गुहा येथे आहेत. दाट झाडाझुडूपांतून, वेली वगैरेंना बाजूला सारत, वाळलेला पाला-पाचोळा तुडवत, पक्ष्यांच्या आवाज ऐकत आपण भीवसुळा गुहांची सैर करतो.

वाघाची गुहा : भीवसुळेतील मुख्य आकर्षण अर्थात ‘वाघाची गुहा.’ या गुहेत पूर्वी वाघाचं वास्तव्य असायचं, असं स्थानिक लोक सांगतात. त्यावरूनच या गुहेला ''वाघाची गुहा'' हे नाव पडलं. सुमारे ३०० फूट लांबीची ही गुहा अचंबित करून टाकते. ऐन उन्हाळ्यातही या गुहेतील तापमान १७-१८ अंश सेल्सिअसपर्यंत कमी असतं. जमिनीच्या खाली मोहोळ करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मधमाशांची मोहोळही येथे आढळतात. या गुहेत जसंजसं आतमध्ये जावं, तसतशा अनेक गुहा लागतात. एक प्रकारे गुहांचा भुलभुलैय्याच. वाघाच्या गुहेसारख्याच अजूनही अनेक गुहा या भागात आहेत. यातील काही एकाचवेळी १०० जण सामावून घेऊ शकतील, एवढ्या मोठ्या आकाराच्या आहेत.

कधी भेट द्यावी : वन विभागाच्‍या परवानगीने आणि स्थानिकांच्या मदतीने आपण वर्षभरातील तीनही ऋतूंमध्ये भीवसुळेला भेट देऊ शकतो. पावसाळ्यात भीवसुळेचं सौंदर्य अजून खुलतं. तेव्हा महाबळेश्वर, पाचगणी भेटीवर आल्यावर भीवसुळेला भेट द्यायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.