कऱ्हाड - राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात कऱ्हाड पालिकेने सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी केली. कऱ्हाडने २२६ पालिकांत अव्वल ठरत माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पहिल्या क्रमांकाच्या पाच कोटींच्या पारितोषिकालाही गवसणी घातली आहे.(Karad Municipality News)
मुंबईत आज स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. त्यात राज्यातील पालिका गटात कऱ्हाड नगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावत सुमारे पाच कोटींचे बक्षीस पटकावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. कऱ्हाड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, रोकडे, मुझफ्फर नदाफ, सुरेश शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारला. माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेतली होती. या स्पर्धत मागील वर्षी नगरपालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. यावर्षी कामगिरीत आणखी सुधारणा करत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. निकाल जाहीर झाल्यानंतर कऱ्हाड पालिकेत कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.
पालिकेने पर्यावरणाच्या दृष्टीने उपक्रम राबवण्यासाठी तीन वर्षांपासून माझी वसुंधरा अभियान सुरू केले आहे. अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पर्यावरणाच्या दृष्टीने कार्यक्रम राबवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी जागतिक पर्यावरणदिनी गौरवले जाते. चार वर्षांपासून शहरामध्ये वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणे ऑक्सिजन झोन बनत आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड व जनजागृती यामुळे प्रोत्साहन मिळाल्याने पालिकेबरोबरच एन्व्हायरो नेचर क्लब तसेच अनेक संस्था, नागरिक या वृक्षसंवर्धन चळवळीत सहभागी झाल्या आहेत. इदगाह मैदानातील सहा एकर जागेत वृक्षारोपण केले आहे. शहरात पर्यावरणासंबंधित करण्यात आलेली जनजागृती तसेच ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेतील सर्व निकषांमध्ये पालिका उत्तीर्ण झाल्याने नगरपारिषद गटात पालिकेला राज्यात प्रथम क्रमांक पटकावता आला.
कर्मचाऱ्यांचा जल्लोष लाडू अन् झाडांची रोपे
माझी वसुंधरा २०२२ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक आल्याचे समजताच माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी पालिकेच्या सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांना लाडू व पेढे भरवून अभिनंदन केले. पालिकेत लाडू वाटले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालिका कर्मचाऱ्यांना झाडांचे वाटपही जगताप यांनी केले. जगताप दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फुलझाडे वाटप करतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.