म्हसवड - दुष्काळी माण तालुक्यातील म्हसवड येथे औरंगाबाद-बंगळूर कॉरिडॉर धर्तीवर गेल्या महिन्यातच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या केंद्रीय एमआयडीसीबाबत तातडीने मंत्रालयात बैठक घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
येथे सुमारे आठ हजार एकर क्षेत्रातील कॉरिडॉर एमआयडीसीसाठी राज्यातील तत्कालीन महाआघाडी सरकारने २२ जूनला अधिसूचना काढून मंजुरी दिली होती. राज्यातील सत्तापालटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाआघाडीच्या सरकारच्या गेल्या महिन्यातील विविध विकासकामांसह अन्य सुमारे १६० विषयांचे मंजूर केलेले आदेश रद्द केले. त्यामुळे म्हसवड येथील मंजूर कॉरिडॉर एमआयडीसी मंजुरीचाही आदेश रद्द झाल्याचा फायदा घेत या नियोजित एमआयडीसीसाठी जागाच उपलब्ध होत नसल्याची दिशाभूल करणारी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांना दिली गेली.
त्यामुळे सातारा-कोरेगाव एमआयडीसी येथे कॉरिडॉर एमआयडीसी उभारली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीयमंत्री निर्मला सीताराम यांच्याशी नुकत्याच झालेल्या कॉरिडॉर एमआयडीसी संदर्भातील ऑनलाइन बैठकीत दिली. त्यामुळे म्हसवड येथील मंजूर एमआयडीसी नामंजूर करून अन्यत्र जागाच उपलब्ध होत नसल्याची कारणे सांगून सातारा -कोरेगाव भागात ती स्थलांतरित करू नये, या निवेदनाद्वारे ‘माण देश (म्हसवड) कॉरिडॉर एमआयडीसी बचाव संघर्ष समिती’च्या वतीने निमंत्रक धनंजय ओंबासे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना मंत्रालयात भेटून मागणी केली.
निवेदनातील आशय पाहिल्यावर एमआयडीसीबाबत समितीसमवेत तातडीने बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी सहायक सचिव सूर्यकांत पाटील यांना दिल्याची माहिती ओंबासे यांनी दिली. जिल्ह्यातील कायम दुष्काळी माण तालुक्यातील म्हसवड येथील प्रस्तावित एमआयडीसीचा साताऱ्यासह सोलापूर व सांगली जिल्ह्यांच्या पाच ते १२ किलोमीटर अंतरावरील तीन जिल्ह्यांतील लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार व नोकरीची संधी मिळणार आहे. प्रस्तावित एमआयडीसीलगतच सातारा -म्हसवड-लातूर व सातारा-म्हसवड-सोलापूर असे सुसज्ज रस्ते उपलब्ध आहेत. पुणे-बंगळूर हा नवीन मंजूर केंद्रीय महामार्ग एमआयडीसीपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. सोलापूर-पुणे व नगर हा केंद्रीय महामार्गही २५ किलोमीटर अंतरावर आहे.
फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गातील प्रस्तावित मंजूर रेल्वे स्टेशनलगतच्या माळशिरस तालुक्यातील जळुबाई घाटाखाली एमआयडीसीपासून सहा किलोमीटर अंतरावर होणार आहे. लोहमार्गासाठी यापूर्वीच भूसंपादन झाले आहे. तालुक्यात उरमोडीचे पाणी आले आहे. प्रस्तावित मंजूर जिहे-कठापूर प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचेही पाणी उपलब्ध होणार आहे. माळशिरस तालुक्यात नीरा उजवा कालवा एमआयडीसीपासून १३ किलोमीटरवर माळशिरस तालुक्यात आहे. मुबलक कमी किमतीत जमीन, रस्ते, वीज, पाणी या एमआयडीसीसाठी गरजेच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. सातारा, सांगली, सोलापूर या दुष्काळी तालुक्यांतील बेरोजगारांना रोजगारासह उद्योग उभारण्याची संधी होणार असल्याने गेल्या महिन्यात राज्य सरकारने मंजूर केलेली एमआयडीसी सातारा-कोरेगाव येथे स्थलांतरित करू नये, अशी विनंती निवेदनात केली आहे.
आठ हजार एकरांवर महाप्रकल्प शक्य
प्रस्तावित एमआयडीसीसाठी सुमारे आठ हजार एकर क्षेत्र आवश्यक आहे. प्रकल्पासाठी संबंधित म्हसवड, मासाळवाडी व धुळदेव या महसुली गावांतील एकत्रित सुमारे ७०० एकर जमिनीचे क्षेत्र सरकारी मालकीचे आहे. उर्वरित क्षेत्र मुरमाड, खडकाळ व सपाट भूभाग नापिक आहे. शासनास सातारा-कोरेगाव येथील जमिनीच्या किमतीपेक्षा कमी किमतीत जमिनी उपलब्ध होणार आहेत. संबंधित शेतकरीही प्रकल्पास जमीन देण्यास इच्छुक आहेत. प्रकल्पास विरोध नाही. भविष्यात आणखी जमिनीची आवश्यकता भासल्यास संबंधित शेतकरी आणखी जमीन उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. प्रस्तावित एमआयडीसीसाठी विजेची गरजही स्थानिक पातळीवर भागू शकते. माण तालुक्यातच म्हसवडलगत तीन सोलर वीजनिर्मिती कार्यान्वित आहेत. तालुक्यातील डोंगरमाथ्यावर सुमारे दोन हजार वीजनिर्मितीचा पवनचक्की प्रकल्प कार्यान्वित असल्याने वीज टंचाईची समस्या नाही.
माढा लोकसभा मतदारसंघातील म्हसवड येथे मंजूर झालेली केंद्र सरकारची कॉरिडॉर एमआयडीसी सातारा-कोरेगाव येथे स्थलांतरित केली जाणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत याविषयी भेट घेतली आहे. म्हसवड येथील मंजूर एमआयडीसी कोणत्याही स्थितीत रद्द केली नाही. तसे कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत. सोमवारी पुन्हा याप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
- रणजितसिंह नाईक-निंबाळकर (खासदार, माढा)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिशाभूल करणारी माहिती देऊन कोणी माण तालुक्यातील म्हसवड येथील मंजूर कॉरिडॉर एमआयडीसी सातारा-कोरेगावकडे नेणार असेल, तर विधानसभेच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून दुष्काळी जनतेला न्याय देण्याची भूमिका घेणार आहे.
- महादेव जानकर (आमदार, रासप)
माण, आटपाडी, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, खटाव तालुक्यांच्या सीमेवरील म्हसवड येथे मंजूर झालेली कॉरिडॉर एमआयडीसी सातारा-कोरेगावकडे स्थलांतरित करण्यास विरोध आहे. याप्रश्नी उद्या (सोमवारी) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटणार आहे.
- गोपीचंद पडळकर (आमदार)
माण देशातील मंजूर कॉरिडॉर एमआयडीसी नामंजूर करून कोणी सातारा-कोरेगाव येथे स्थलांतरित केल्यास मुंबई-ठाणेस्थित माणदेशवासीयांयह माण-खटाव, माळशिरस, आटपाडी, सांगोला यालगतच्या तालुक्यांतील बेरोजगार युवकांसह ग्रामस्थांचे आंदोलन करू.
- धनंजय ओंबासे (निमंत्रक, माण देश म्हसवड कॉरिडॉर एमआयडीसी बचाव संघर्ष समिती)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.