Karhad: पाण्याअभावी निर्माण झालेली टंचाईची स्थिती, चारा उपलब्धतेची अनिश्चितता आणि पशुखाद्याचे गगनाला भिडलेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी अगोदरच आर्थिकदृष्ट्या खचला आहे.
त्यातच सध्या गाईच्या दुधाचे दर पुन्हा दोन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रती लिटरचा २९ रुपयाच्या दरावरून घसरून तो २७ रुपयांवर आला आहे.
लिटरला दोन रुपये कमी झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसाला ३५ लाख ४० हजार ८०० रुपयांचा दररोज फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडून वाढत्या खर्चामुळे जनावरे सांभाळणेही मुश्कील बनले आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी घरी दोन-चार जनावरे सांभाळली आहेत. त्यातून दूध व्यवसाय शेतकरी करतात. त्यामध्ये गाईंची संख्या मोठी आहे. त्यातून शेतकऱ्यांना दर महिन्याकाठी कुटुंबाचा खर्च भागेल एवढे उत्पन्न मिळत होते. त्यामुळे शेतकरीही गेल्या अनेक वर्षांपासून जनावरे सांभाळून त्यावर कुटुंबाची गुजराण करत आहेत. त्यामुळे कुटुंबालाही आर्थिक हातभार लाभत होता.
जिल्ह्यात मागील वर्षी ४० टक्के पाऊसमान कमी झाले आहे. त्यामुळे यंदा टंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचाही मोठा प्रश्न सध्या उभा आहे. त्यातच सरकारने चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्या सुरू केलेल्या नाहीत. त्याचबरोबर चाऱ्यासाठी अनुदानही दिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे जनावरे जगवायची कशी हा मोठा प्रश्न उभा आहे. चारा मिळवण्यासाठी बळीराजाला पदरमोड करून मोठी धडपड करावी लागत आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यंतरी पाऊस झाला. मात्र, त्याने पुन्हा उघडीप दिल्याने उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत टंचाई वाढून पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही झाला आहे. उष्ण वातावरणामुळे जिल्ह्यात सुमारे तीस ते चाळीस हजार लिटर दूध संकलनात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
गावोगावच्या जत्रा-यात्रा, लग्न सोहळा व अन्य कार्यक्रमांसाठी लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे. मुंबई-पुण्यासह अन्य ठिकाणी कामानिमित्ताने स्थायिक झालेले चाकरमानी जिल्ह्यातील त्यांच्या गावी आले आहेत. त्यामुळे दुधाला मागणी वाढली आहे. त्याचबरोबर दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांनाही मागणी वाढली आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, मागणी वाढूनही दुधाचे दर दोन रुपयांनी कमी झाल्याने आश्चर्यच व्यक्त होत आहे.
शासनाने दूध दरासाठी समिती नियुक्ती केली होती. त्या समितीने ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये प्रती लिटर दर द्यावा, अशी शिफारस केली. मात्र, त्याकडे सर्वच पातळ्यांवर दुर्लक्ष झाले. त्यामुळे दुधाचा दर २५ रुपयांपर्यंत खाली आला होता. दीड महिन्यांपूर्वी त्यात वाढ करून तो दर २७ रुपये करण्यात आला. त्यानंतर दूध दरासंदर्भात राज्यात मोठा उठाव झाला. त्यामुळे दूध दर २९ रुपये आणि सरकार पाच रुपये अनुदान देणार असा ३४ रुपये दर निश्चित करण्यात आला. मात्र, सध्या तो दर पुन्हा दोन रुपये घसरून २७ रुपयांवर आला आहे.
जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरात असलेल्या उसासह ओल्या मक्याच्या दरात गेल्या दोन महिन्यांत प्रती टनाला सहाशे ते सातशे रुपयांनी वाढ झाली. कडबा प्रती शेकड्याला ५०० रुपयांनी वाढला. एकेकाळी फेकून दिला जाणारा गव्हाचा भुसा आता आठ हजार रुपये टनांनी विकला जातोय. जनावरांच्या खाद्याच्या पोत्याची किंमत दुप्पटीने वाढून ती १३५० ते १६०० दरम्यान झाली आहे. सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दुष्काळी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्याचबरोबर दूध उत्पादनात सरासरी वीस टक्के घट झाली आहे. त्यामुळे खाद्य, जनावरांचा चारा, औषधोपचार आदींसाठी दुधाचा एका लिटरला खर्च सुमारे २२ ते २५ रुपये येत आहे. अशा परिस्थितीत दूध व्यवसाय जोपासण्यासाठी धडपड सुरू असताना दुधाचे दरही कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.
टंचाईमुळे जनावरांना कसं जगवायचे हा आमच्या समोरचा एक प्रश्न आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्यामुळे चारा विकत घ्यावा लागतोय, तरीही सध्या दुधाचे दर ढासळून २७ रुपयांवर आले आहेत. त्यामुळे जनावरे ठेवायची का विकायची हाच एक प्रश्न आमच्यासमोर आहे. पाण्याच्या बाटलीपेक्षाही गायीचे दूध स्वस्त आहे. त्यामुळे आमच्या हातात शेणाशिवाय काय शिल्लक राहात नाही. त्याचा विचार सरकारने करावा.
विजय देवकर
शेतकऱ्याला कोणी फसवेना तो आळशी झाला आहे. सातारा जिल्ह्यात गाईच्या दुधाला २७ रुपये दर दिला जातो. तोच अन्य राज्यात जास्त दर आहे. तेथे परवडतो मग जिल्ह्यात का परवडत नाही? सध्या एक लिटर दूध उत्पादनासाठी चारा, पशुखाद्य, औषधोपचार व अन्य असा मिळून २८ ते २९ रुपये खर्च येत आहे, तरीही शेतकरी गप्पच आहेत. शेतकरी उठाव करत नाही. त्यामुळे डेअरीवाल्यांचे साधते आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी जागे होणे गरजेचे आहे.
सुशांत जाधव
.....................................
दूध पावडरच्या किमती कमी झाल्यामुळे पावडर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दूध खरेदी दर २४ ते २५ रुपयांवर आणले आहेत. त्यामुळे सरकारने दूध पावडर कंपन्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यात दूध पावडर आयातीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप का घेतला नाही?
-राजू शेट्टी,
अर्थसंकल्पातून राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाजर हलवा वाटण्यात आला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याला उत्पादन खर्च एवढा सुद्धा दुधाला दर मिळत नाही. त्यातच केंद्र सरकारने दूध पावडर आयात कर माफ केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात दुधाचे दर अजून कमी होतील.
-पंजाबराव पाटील,
शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडत नाही. अनेक दूध संघांनी गायीच्या दुधाचा दर २९ रुपये असताना २७ रुपयांहून खाली आणला आहे. सरकार त्या संघांना जाब विचारणार आहे की नाही?
तालुका जनावरांची संख्या
महाबळेश्वर १५ हजार ५७६
वाई ५९ हजार ३७०
खंडाळा ८३ हजार ५५१
फलटण दोन लाख ४८ हजार तीन
माण दोन लाख २९ हजार ९१
खटाव एक लाख ५१ हजार ३०
कोरेगाव ९० हजार २२९
सातारा ८२ हजार ५४५
जावळी २४ हजार ३८
पाटण एक लाख १४६
कऱ्हाड एक लाख ४७ हजार ६८५
.................................................
म्हशीचे दूध
जिल्ह्यातील उत्पादन ः तीन लाख ९०० लिटर
जिल्ह्याबाहेरील खरेदी ः ३० हजार ७००
एकूण ः तीन लाख ३१ हजार ६००
गायीचे दूध
जिल्ह्यातील उत्पादन ः १२ लाख ९० हजार ६०० लिटर
जिल्ह्याबाहेरील खरेदी ः चार लाख ७९ हजार ८००
एकूण ः १७ लाख ७० हजार ४०० लिटर
......................
जिल्ह्यातील एकूण दूध संकलन ः २१ लाख दोन हजार लिटर
....................
लोकसभा निवडणुकीत दूध, कांदा दराचे मुद्दे प्रभावी ठरले होते. अधिवेशनात विरोधकही आक्रमक झाल्याने महायुती सरकारने गांभीर्याने या विषयात लक्ष घातले आहे. या संदर्भात महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख दूध संस्था, तसेच शेतकरी संघटना प्रतिनिधी यांची बैठक शनिवारी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.