उदयनराजेंनी केलेल्या पराभवाचा सहकारमंत्री वचपा काढणार?

सहकारमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक; दिग्गज नेत्यांनी रणनिती आखण्यास सुरवात
Balasaheb Patil-Udayanraje Bhosale
Balasaheb Patil-Udayanraje Bhosaleesakal
Updated on

सातारा : सध्या साताऱ्यात पालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरु असतानाच आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीची (Satara District Bank Election) प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी रणनिती आखण्यास सुरवात केलीय. यापूर्वी गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा मतदारसंघातून खासदार उदयनराजेंनी (MP Udayanraje Bhosale) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांना पराभूत केले होते. त्यानंतरच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अखेर बाळासाहेब पाटील यांना तज्ञ संचालक म्हणून बँकेवर घेतले होते. आता यावेळची निवडणूक सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याने ते या निवडणुकीत मागील निवडणुकीत उदयनराजेंनी केलेल्या पराभवाचा वचपा काढणार का?, हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Summary

जिल्हा बँकेची निवडणूक सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

सातारा जिल्हा बँकेची निवडणुकीची प्रक्रिया ठराव पूर्ण होऊन स्थगित झाली होती. आता कच्ची मतदारयादी प्रसिध्द करून निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थंडावलेली प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून यावेळेस जिल्हा बँकेची निवडणूक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक सहकार मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची आहे. यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता पालकमंत्री पाटील यावेळेस थोडे जास्त लक्ष या निवडणुकीत घालणार आहेत. यावेळेस ते सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. त्यासाठीचे ठराव ही त्यांनी करून पाठविलेले आहेत. जिल्हा बँकेच्या २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहकार पॅनेल विरूद्ध आमदार विलासराव उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे रयत पॅनेल अशी लढत झाली होती.

Balasaheb Patil-Udayanraje Bhosale
माथाडींच्या वय निश्चितीबाबत कोणतीही कार्यवाही नको : मुश्रीफ

या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी लढत ठरली ती गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा मतदारसंघाची. या मतदारसंघातून त्यावेळी उदयनराजे भोसले व कराड दक्षिणचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यात झाली होती. या निवडणुकीदरम्यानच सातारच्या राजघराण्यातील नेत्यांचे मनोमिलन झाले होते. त्यामुळे सर्वाधिक मते असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राजकारणाला महत्व देणार, की राजघराण्याच्या मनोमिलनाला याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा बॅंकेची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रसेने पक्षीय स्तरावर लढण्याचा निर्णय घेतल्याने सर्वाधिक मतदान असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अडचण झाली होती. या निवडणुकीदरम्यान मतदारसंख्येनुसार जागावाटप व्हावे, असा आग्रह आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा होता. त्यानुसार पक्षातर्फे त्यांना जादा जागा देण्यात आल्या.

Balasaheb Patil-Udayanraje Bhosale
शिंदे दाम्पत्याने पालिकेची अब्रू आणली चव्हाट्यावर

गृहनिर्माण व पाणीपुरवठा मतदारसंघात सातारा तालुक्‍यात 174 निर्णायक मतदान असल्याने आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विजयाची धुरा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, पक्षनिष्ठेपेक्षा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनोमिलनास पसंती दिली. त्यामुळे उदयनराजेंना 228, तर आमदार बाळासाहेब पाटील यांना 112 मते मिळाली. बाळासाहेब पाटील यांचा 116 मतांनी पराभव झाला होता. निर्णायक मतदान प्राप्त करण्यात उदयनराजे भोसलेंना "मनोमिलन पटर्न' उपयोगी पडला होता. यानंतर झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर बाळासाहेब पाटील यांना तज्ञ संचालक म्हणून घेण्यात आले. कारण त्यानंतर उदयनराजे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले होते. आता खासदार उदयनराजे भोसले हे जिल्हा बँकेचे संचालक असले तरी ते भाजपमध्ये आहेत. तर आमदार बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकार मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री आहेत. यावेळची जिल्हा बँकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखालीच होणार आहे. त्यामुळे २००७ च्या पराभवाचा बदला श्री. पाटील या निवडणुकीत घेण्याची शक्यता आहे.

Balasaheb Patil-Udayanraje Bhosale
15 वर्षात राष्ट्रवादीचे जबरदस्त वर्चस्व; भाजपचीही जोरदार मुसंडी!

यावेळेस मंत्री बाळासाहेब पाटील हे विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून लढणार आहेत, तर गृहनिर्माण व पाणी पुरवठा मतदारसंघातून उदयनराजेंऐवजी राष्ट्रवादी दुसरा उमेदवार देण्याची शक्यता आहे. पण, या मतदारसंघातून सर्वाधिक मते ज्यांच्याकडे आहेत, ते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये असल्याने त्यांच्या सहकार्यानेच राष्ट्रवादीचे नेते निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे उदयनराजेंना निर्णायक मते देण्यास ते तयार होणार का, ही उत्सुकता आहे. येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील कोणती भूमिका घेणार यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे मागील पराभवाचा बदला या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील घेणार का, याची देखील उत्सुकता आहे. त्यामुळे या निवडणुकीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या रणसंग्रामात कोण आपली बाजू भक्कम करणार, हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()