आम्ही आघाडी धर्म पाळतोय; परंतु त्यांना आघाडी धर्माचा विसर पडला आहे.
कोरेगाव (सातारा) : जिहे-कटापूर योजनेला (Jihe-Katapur scheme) केंद्रीय जलआयोगाची मान्यता अद्याप मिळाली नाही, मग ८०० कोटींचा निधी कुठून आला? लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या योजनेसाठी निधी दिल्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी सांगत आहेत. राज्यातील आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला येनकेन प्रकारे त्रास देणाऱ्या केंद्रातील भाजपची तळी उचलण्याचे काम ते करत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या योजनेचे उद्घाटन होणार असल्याचे माहीत असताना सर्व मीच केले, असा ढिंढोरा पिटत कोणतेही योगदान नसताना 'जिहे-कटापूर'चे जलपूजन करून श्रेय लाटण्याचा उद्योग करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची भक्कम तयारी आम्ही केली आहे, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टीका केली.
'जिहे-कटापूर'चे जलपूजन आमदार महेश शिंदे यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत टीका केली. ते म्हणाले, "मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन झाले. त्यामुळे या योजनेला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी व्यक्तिश: माझी तसेच अनेकांची मागणी आहे. त्यांच्याविषयी आपुलकी असेल, तर त्यांचे नाव विद्यमान लोकप्रतिनिधींनी या योजनेला द्यावे. आतापर्यंत या योजनेसाठी भाऊसाहेब गुदगे, डॉ. दिलीप येळगावकर, जयकुमार गोरे यांच्यासह मी स्वतः असे अनेकांनी प्रयत्न केले आहेत. एक-दोन वर्षांत योजना झाली नाही. त्याचे श्रेय भाजपला अजिबात नाही, तर ते केवळ महाविकास आघाडीला आहे.
जलसंपदा विभाग २५ वर्षे आमच्याकडे म्हणजे राष्ट्रवादीकडे होता, याच काळात जास्त म्हणजे ६३७ कोटी मिळाले. त्यापैकी १८० कोटी मी जलसंपदामंत्री असताना मिळाले. गिरीश महाजन मंत्री असताना या ठिकाणी येऊन गेले. केंद्रीय जलआयोगाकडून निधी मिळवून देतो, असे सांगून निघून गेले. पण, एक रुपयाही दिला नाही. गेल्या २८ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्रीय जलआयोगाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, त्यास अद्याप मान्यता मिळाली नाही. मग ८०० कोटी कुठून आले? आम्ही आघाडी धर्म पाळतोय; परंतु त्यांना आघाडी धर्माचा विसर पडला आहे. पूर्वी ते 'भाजपने केले', असे म्हणायचे. आता नाइलाजाने शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे नाव घेत आहेत. मनाचा मोठेपणा दाखवण्याचीही दानत असावी लागते," अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे यांनी सुनावले.
कंत्राटदार, अधिकाऱ्यांना दम
दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या व आता सुरू झालेल्या कामांची पाहणी करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. कंत्राटदार, अधिकाऱ्यांना कोण दम मारत आहे, हे माहिती पडू लागले आहे. दोन वर्षांत जनतेने हे ओळखले असून, या सर्व परिणामांची प्रचिती आगामी काळात येणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.