'आमदार शशिकांत शिंदेंना भरपूर काही दिलं; पण त्यांनी..'
सायगाव (सातारा) : कुडाळ गटात व सायगाव गणामध्ये पैशाची ताकद दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत खूप वाट पाहिली, माझ्यासोबत येतील, एकत्र काम करतील, मात्र त्यांनीच वेगळा मार्ग निवडला. या गणातून ‘त्यांना’ कायमचे हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करू, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी सुहास गिरी यांचे नाव न घेता केले.
आनेवाडी (ता. जावळी) येथील विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare), जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane), उपसभापती सौरभ शिंदे, मालोजी शिंदे, जयदीप शिंदे, राजेंद्र फरांदे उपस्थित होते. या वेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे व सर्व कार्यकर्ते मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत काम करताना तुम्ही सांगाल तिथे आणि सांगाल तसे काम करू. लोकांनी सांगितले, तरी न ऐकता ज्यांना दोन वेळा सभापतिपद दिले त्यांनी घेतलेला वेगळा पवित्रा पाहता आता सायगाव गणात स्पष्ट भूमिका घेऊन काम करायचे, पैशाची ताकद आता चालू द्यायची नाही. आता एकच टारगेट सायगाव गण आणि कुडाळ गट. आगामी काळात या विभागात सर्वांनी मिळून निश्चित बदल घडवू. मी कार्यसम्राट, दमदार आमदार असं काही नाही, मी सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून काम करीत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत लक्ष ठेऊन सायगाव गण आणि कुडाळ गटातही करेक्ट कार्यक्रम करणार.’’
वसंत मानकुमरे म्हणाले, ‘‘जावळीने आमदार शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) भरपूर काही दिले; पण त्यांनी मात्र तालुक्यातील तरुणांकडे कायम दुर्लक्ष केले. येणाऱ्या काळात जिल्हा बँक व जावली बॅंकेच्या माध्यमातून युवकांना नोकरी उपलब्ध करून देऊ. त्याकरिता शिवेंद्रसिंहराजेंनी लक्ष घालावे.’’ ज्ञानदेव रांजणे म्हणाले, ‘‘यापुढील काळात महाराजसाहेब जसे सांगतील त्याचप्रमाणे तालुक्यात होणार. वसंतराव मानकुमरे यांच्या कप्तानपदाखाली आम्ही सर्व जण काम करणार.’’
‘किसन वीर’च्या ताब्यातून ‘प्रतापगड’मुक्त झाला पाहिजे, यासाठी अजितदादांच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. तशा प्रकारची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून, सौरभ शिंदे आणि मी ‘प्रतापगड’ नक्की सुरू करू. त्यासाठी अजिंक्यतारा कारखान्याच्या माध्यमातून जी काही मदत करता येईल ती करू.
- शिवेंद्रराजे भोसले, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.