गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर रक्षा विसर्जनाच्या दिवशी स्मशानभूमीचा ताबा वानरांच्या कळपांकडेच असतो.
ढेबेवाडी : केवळ शिवारातील पिके, फळबागा आणि घरांच्या छप्परावर वाळवत टाकलेल्या धान्याचाच नव्हे, तर स्मशानभूमीचाही (Cemetery) ताबा वानरांच्या कळपांनी घेतल्याचे चित्र खळे (ता. पाटण) येथे दृष्टीला पडत आहे. रक्षाविसर्जन विधी वेळी वानरांना हुसकावताना ग्रामस्थांची तारांबळ उडत आहे.
वनविभागाने तातडीने आवश्यक पावले उचलून वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. विभागात अन्य गावांच्या तुलनेत खळे, तळमावले परिसरात वानरांचा (Monkey) उपद्रव अधिक आहे. तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाची फळबागही वानरांनी उजाड बनवली आहे.
या बागेत आंबा, चिक्कू, फणस आदी फळझाडे मोठ्या प्रमाणात आहेत. वानरांचे कळप मुक्कामी असल्याने महाविद्यालय, तसेच त्याच परिसरात असलेल्या श्री वाल्मीकी विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उपद्रव टाळण्यासाठी नागरिक फटाके वाजविण्यासह काही उपाययोजना करताना दिसत आहेत.
अलीकडे तर काहींनी बिबट्याला पळवून लावण्यासाठी चक्क व्यवसाय व घरांच्या ठिकाणी भिंतीवर हुबेहूब अशी बिबट्याची चित्रे काढली आहेत. खळ्यात तर वानरांनी गावकऱ्यांना सळो, की पळो करून सोडले आहे. घरांच्या छप्परांवर, तसेच शिवारात वानरांच्या कळपांचा दिवसभर वावर असून, छप्परावरून इकडून तिकडे उड्या मारण्यामुळे कौले फुटून नुकसान होत आहे. गावालगतच असलेल्या स्मशानभूमीतील झाडांवर वानरांचे कळप मुक्कामाला आहेत.
गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर रक्षा विसर्जनाच्या दिवशी स्मशानभूमीचा ताबा वानरांच्या कळपांकडेच असतो. स्मशानभूमीकडे जातानाच अनेकदा डोक्यावरील पाटीतून वरच्यावरच वानरे नैवेद्य पळवितात. विधी सुरू असताना स्मशानभूमीला वानरांचा गराडा पडत असल्याने गावकरी हातात काठी घेऊन त्यांना हुसकविण्यासाठी तेथे थांबलेले असतात. या कारणाने कावळे किंवा अन्य पक्षी तेथे थांबत नाहीत, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.