'कोण काय म्हणतंय, याच्याशी मला काहीच घेणं-देणं नाही.'
सातारा : नगरपालिकेच्या (Satara Municipality) माध्यमातून शहरात विकासकामे केल्याने नारळ फोडतो. विकासकामांबाबत तुम्ही चर्चेला समोरासमोर या, कधीही मी तयार आहे, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी नाव न घेता आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendrasinharaje Bhosale) यांना दिले.
सातारा विकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी नगरपालिकेच्या कॅम्प सदरबझार येथील नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ॲड. दत्ता बनकर, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, निशांत पाटील, वसंत लेवे, राजू भोसले, सभागृह नेत्या स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, किशोर शिंदे, सुहास राजेशिर्के, सुनील काटकर आदी यावेळी उपस्थित होते. सातारा विकास आघाडीच्या वतीने उदयनराजेंचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यंदा पालिकेच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभेची मुदत संपत असताना प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा घेऊन पालिका निवडणुकीच्या तोंडावर सातारा विकास आघाडीने (Satara Vikas Aghadi) शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
उदयनराजे म्हणाले, ‘‘सातारा नगरपालिका ही आदर्श पालिका होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. मात्र, कोण काय म्हणतंय, याच्याशी मला काहीच घेणं नाही. सातारकरांच्या पाठबळावर मी ठाम असून भविष्यातही मी आपल्या सेवेत रुजू आहे.’’ आमच्यावर टीका करणारे करतील. पण, जे काम करतात, तेच नारळ फोडतात. चर्चेला याल तर धाडस ठेवा, असे आव्हान त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले. निशांत पाटील यांनी प्रास्तविकात नूतन इमारतीच्या जागा हस्तांतरणाचा प्रवास सांगितला. उदयनराजेंच्या माध्यमातून साताऱ्यात अनेक पायाभूत विकासकामे मार्गी लागत आहेत, असे त्यांनी नमूद केले. वास्तुविशारद सुहास तळेकर नूतन इमारतीचे तांत्रिक विश्लेषण करताना सहा मजली इमारतीत पहिले तीन मजले पार्किंग व वरचे तीन मजले कार्यालयीन कामासाठी बांधणार असल्याचे सांगितले. शिरीष चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले.
माझं तोंडभरून कौतुक झाल्याबद्दल मी आभारी आहे. सातारकर माझं हृदय आहे, त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. मी तुमच्या सर्वांचे प्रेम कमावले आहे, ते गमावणार नाही. या प्रेमाची परतफेड विकासकामांच्या माध्यमातून करतोय, असे भाषणाच्या शेवटी सांगताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.