विसापुरातील खून चोरीच्या उद्देशानेच

मृत महिलेच्‍या अंगावरील दागिने लंपास; मारेकऱ्याच्या हाताचा ठसाही नाही
Murder in Visapur was for purpose of theft
Murder in Visapur was for purpose of theftSakal
Updated on

विसापूर - विसापूर (ता. खटाव) येथील वृद्ध दांपत्याच्‍या खुनाची घटना उघडकीस येण्याआधी एक दिवस झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. घटनास्थळावर पोलिसांना कोणतेही हत्यार किंवा संशयित मारेकऱ्यांच्या हातांचे ठसे मिळाले नाहीत. मृत महिलेच्या अंगावरील दागिने गायब झाले आहेत. मात्र, इतर कोणत्याही मौल्यवान वस्तूंना हात न लावल्याने या गुन्ह्याचा तपास आव्हानात्मक झाला आहे. अज्ञाताविरोधात दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हणमंत भाऊ निकम (वय ६८) आणि कमल हणमंत निकम (वय ६५) यांचा खून झाल्याचे काल (शनिवारी) रात्री उघडकीस आले. हणमंत निकम यांच्याशेजारी राहणाऱ्या अर्चना शिंदे यांनी कमल यांच्याकडे दहा दिवसांपूर्वी ब्लाऊज शिवायला दिले होते. शुक्रवारी (ता. ८) कमल यांनी अर्चना यांना घरी बोलावून शिवलेला ब्लाऊज दिला होता. त्यावेळी त्यांनी घरगुती गप्पाही मारल्या होत्या. त्यानंतर नळाला पाणी आल्याचे अर्चना यांनी निकम दाम्पत्याला सांगितले. निकम यांनी पाणीही भरले होते.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल (शनिवारी) दिवसभर पावसाच्या सरी येत राहिल्याने निकम यांच्या घराकडे कुणाचे फारसे लक्ष गेले नाही. संध्याकाळी शेजारील उषा सावंत यांनी अर्चना यांना हाक मारून सकाळपासून निकम दांपत्याच्‍या घराच्या दोन्ही खोल्यांच्या दरवाजांना बाहेरून कडी असल्याचे आणि लाइटही बंद असल्याचे सांगितले. अर्चना यांनी कमल यांच्या मोबाईलवर फोन लावला. तो त्यांनी उचलला नाही. त्यानंतर निकम यांच्या स्नुषा विशाखा यांनाही फोन करून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांनी त्यांचाही फोन सासू-सासऱ्यांनी उचलला नाही, तुम्हीच घरी जाऊन बघा, असे अर्चना यांना सांगितले.

शेजाऱ्यांनी निकम यांच्या घराच्या दोन्ही खोल्यांच्या कड्या उघडल्या, तेव्हा पती-पत्नीचे मृतदेह निपचित पडलेले होते. दोघांच्याही नाका-तोंडातून आलेले रक्त सुकून गेले होते. कमल यांच्या गळ्यातील दागिने लंपास झाले होते. हणमंत निकम यांच्या तोंडावर मारहाण झाल्याच्या खुणा प्रत्यक्षदर्शिंना दिसल्या. या घटनेची माहिती पोलिस पाटील प्रल्हाद सावंत यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली.

पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पुसेगावचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे यांनी घटनास्थळी भेट दिली. दांपत्याच्‍या राहत्या घरात खून करून गुन्हेगार घराला बाहेरून कडी लावून पसार झाले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्यांना कोणतेच ठसे मिळाले नाहीत. निकम यांच्या घरातील साहित्यही अस्ताव्यस्त झाले नव्हते. त्यामुळे अज्ञात मारेकऱ्यांबाबत पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत. त्यातच घटनेची माहिती मिळण्यासाठी वेळ लागल्याने आणि गुन्ह्याची उकल होण्याच्या दिशेने कोणतेही कारण व महिती सामोर येत नसल्याने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.

पुसेगाव पोलिस ठाणे हद्दीतील वर्षभरात खुनाची ही दुसरी घटना आहे. हे खून रात्रीच्या सुमारास घडले असल्याने पोलिसांना रात्रगस्त तसेच पेट्रोलिंग वाढवावे लागणार आहे. कोणताच पुरावा अद्याप हाती लागला नसल्याने विसापुरातील दुहेरी हत्याकांडातील संशयित शोधण्यासाठी पोलिसांना त्यांचे कसब पणाला लावावे लागणार आहे.

कमल निकम यांना दागिन्‍यांची हौस

कमल निकम या सुरुवातीपासून शिवणकाम करीत होत्या. सोन्याचे दागिने दररोज घालण्याची त्यांना फार हौस होती. त्यांच्या गळ्यात व हातात विविध प्रकारचे सोन्याचे दागिने होते; परंतु खुनानंतर त्यांच्या गळ्यात केवळ एकच सोन्याचे मंगळसूत्र होते. कमल निकम यांच्या गळ्यातील दागिने लंपास केले असण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.