NCP Politics : साताऱ्यात राष्ट्रवादीने गमावले 'इतके' आमदार-खासदार; बालेकिल्ला पुन्हा बांधण्याची गरज, पक्षाची पडझड

खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
Sharad Pawar vs Ajit Pawar
Sharad Pawar vs Ajit Pawaresakal
Updated on
Summary

सुरुवातीला मंत्रिपदाच्या अपेक्षेने काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत उभी फूट पडली.

सातारा : जिल्ह्यात एकेकाळी दोन खासदार आणि तब्बल नऊ आमदार अशी ताकद असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) अलीकडच्या काळात वाताहत झाल्याचे चित्र आहे. पक्षाची दोन शकले होऊन सध्या बालेकिल्ल्यात केवळ तीन आमदार उरले आहेत. पक्षाचा आज (सोमवारी) २५ वा वर्धापनदिन (NCP Anniversary) साजरा होताना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करून कमी झालेली ताकद पुन्हा उभी करण्यासाठी पुन्हा एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे.

खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी जिल्ह्यातील सर्वाधिक काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत दोन खासदार आणि नऊ आमदार निवडून आले. त्यानंतर एकेक करीत जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था ताब्यात घेतल्या. त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला राष्ट्रवादीमय झाला. त्यावेळेपासून जिल्ह्यातील जनतेने शरद पवार यांची पाठराखण केली. काँग्रेसच्या ताब्यातील जिल्हा बँक ताब्यात घेतली.

Sharad Pawar vs Ajit Pawar
Dr. Amol Kolhe : आगामी विधानसभा निवडणुकीत 'मविआ'ला 200 च्या वर जागा मिळणार; खासदार कोल्हेंना विश्वास

जिल्हा बँक ही सहकाराची मातृसंस्था राजकारणातील उलाढालीचे केंद्र बनले. ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, लक्ष्मणराव पाटील, विक्रमसिंह पाटणकर, मदनराव पिसाळ, सदाशिव पोळ, यांच्यानंतर बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, बाळासाहेब भिलारे या नेत्यांनी राष्ट्रवादी रुजवली. एकसंध असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांना मोठे होण्याच्या अपेक्षेने ग्रासले होते. परिणामी, राष्ट्रवादीत अंतर्गत हेवेदावे आणि कुरघोड्या सुरू झाल्या. या सर्व घडामोडीतही राजे गटाने आपले वर्चस्व निर्माण केले.

यामध्ये फलटणचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले. राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार यांना मानणारा गट अशी गटबाजी सुरू झाली; ती सुप्त होती; पण याच दरम्यान या बालेकिल्ल्यावर भाजपची नजर पडली. त्यांनी बालेकिल्ल्यात पाय पसरविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मंत्रिपदाच्या अपेक्षेने काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत उभी फूट पडली.

Sharad Pawar vs Ajit Pawar
'संविधानात बदल, आदिवासी-मागासवर्गीयांचं आरक्षण जाणार हा अपप्रचार खोडून काढण्यात आम्ही कमी पडलो'

अजित पवारांसोबत रामराजे, मकरंद पाटील आणि दीपक चव्हाण गेले, तर शरद पवार यांच्यासोबत बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील व शशिकांत शिंदे राहिले. याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीत दिसला. बालेकिल्ल्यात भाजपचा खासदार उदयनराजे यांच्या माध्यमातून विजयी झाला. सध्या राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे विधानसभेचे दोन आणि विधान परिषदेचे एक तर शरद पवार पक्षाचे विधानसभेचा एक आणि विधान परिषदेचा एक असे दोन आमदार आहेत.

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येणे गरजेचे...

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हक्काची साताऱ्याची जागा गमावली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत किमान आहे हे तीन आमदार टिकविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रयत्न करावे लागतील. ज्या ठिकाणी भाजपची ताकद वाढली आहे, तेथे राष्ट्रवादीला बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. आजही जिल्ह्यातील जनता शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे चित्र असले तरी ढासळलेला बालेकिल्ला पुन्हा उभा करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे, अन्यथा लोकसभा गेली तशी विधानसभेच्या निवडणुकीत ही उरलेले तीन आमदार विरोधकांच्या ताब्यात जाण्याची भीती आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.