बँकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलमधून लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) कऱ्हाड सोसायटी (Karad Society) मतदारसंघात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) व विलासराव पाटील-उंडाळकरांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील (Udaysingh Patil) यांच्यात काट्याची व प्रतिष्ठेची लढत होत आहे. दोघांनीही थेट मतदारांशी संपर्कावर भर दिला आहे. सहकारमंत्र्यांना उदयसिंह पाटील रोखणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकमेकांसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या या दोघांची निवडणुकीसंदर्भातील नेमकी भूमिका ‘सकाळ’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच रिंगणात
कऱ्हाड : जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलमधून लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अर्ज माघारीच्या दिवशी २१ पैकी दहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरू असल्याने गेल्या वर्षीपेक्षा चांगली प्रगती झाली आहे. उर्वरित ११ जागांसाठी निवडणूक लागली असून, जिल्हा बँक ही सेवेचे माध्यम आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी निवडणुकीला सामोरे जात आहे, असे स्पष्ट मत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘माझी सुरुवात सहकारातून झाली. मी पहिल्यांदा सह्याद्री कारखान्याचा संचालक झालो. त्यानंतर मी कारखान्याचा अध्यक्ष म्हणून काम केले. १९९९ मध्ये आमदार झालो. सध्या मला सहकारमंत्री म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संधी दिली. जिल्हा बॅंकेच्या अर्थकारणात सह्याद्री साखर कारखान्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आमच्या काही मागण्या असतात, त्यादृष्टीने मी निवडणुकीकडे पाहात आहे. मी प्रत्येक मतदाराला घरी जाऊन भेटत आहे. सभासद मतदार मोठ्या उत्साहात स्वागत करून तुम्ही जिल्हा बॅंकेत असले पाहिजे, असे सांगत आहेत. कोल्हापूर जिल्हा बॅंकेत हसन मुश्रीफ, मंत्री बंटी पाटील आहेत, विट्याला अनिल बाबर, मोहनराव कदम, पुण्याला अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, दिलीप मोहिते, रमेश सपकाळ, संग्राम थोपटे, साताऱ्यात रामराजे नाईक-निंबाळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील आहेत, अमरावतीला यशोमती ठाकूर आहेत, सुनील केदार, एकनाथ खडसे आहेत. ही सत्तेसाठी जिल्हा बॅंकेत गेलेली माणसे नाहीत. जिल्हा बॅंक ही सेवेचे माध्यम आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी निवडणुकीला सामोरे जात आहे.’’
भाजपचा पाठिंबा घेणार का, या प्रश्नावर पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर लढल्या जातात. त्या लढताना काही लोक एकमेकांना सहकार्य करतात. राज्यात अनेक ठिकाणी अनेक पक्षाचे लोक एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातात. जिल्हा बॅंकेत राजे-महाराजांचा थाट मला दिसून आला नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे मला राज्याच्या सहकामंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे. राज्यातील जिल्हा बॅंका, नागरी बॅंका, पतसंस्था, सोसायट्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी पाहिले की सातारा जिल्हा बॅंकेत एक जरी विषय असला तरी त्याचे सर्व विमोचन केलेले असते. एखाद्या संस्थेला कर्ज द्यायचे असेल तर बॅंकेचे हित नजरेसमोर ठेऊन सर्व माहिती त्यात दिलेली असते. त्यामुळे तेथे थाट कोणाचा नसतो. आम्ही सर्व एक असतो. अधिकारी, कर्मचारी चांगले आहेत. त्यामुळे बॅंकेचे चांगले कामकाज सुरू आहे.
शंभूराज देसार्इंबद्दल मला माहिती नाही
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमध्ये घेतले जाणार होते. याविषयी ते म्हणाले, ‘‘त्यांना पॅनेलमध्ये घेतले जाणार होते किंवा नाही, याची मला काहीही माहिती नाही. मी जिल्हा बॅंकेच्या निवडणूक प्रक्रियेत आहे. मात्र, त्यांचे वरिष्ठ पातळीवर काय झाले, मला माहिती नाही. माझेही १५ दिवस मंत्री देसाईंशी काही बोलणे झालेले नाही. ज्यांनी आमच्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली, ज्यांची अपेक्षा आहे, त्यांना बरोबर घेऊन चर्चा केली. चर्चा करण्यासाठी आमच्या नेतेमंडळींकडे कोणी आले, त्यांचा विचार केला गेला. जिल्हा बॅंक राजकारणविरहित चालते. त्यामुळे ११ जागा बिनविरोध झाल्या.’’
काकांचे कार्य पुढे नेण्यासाठी रिंगणात
विलासराव पाटील-उंडाळकर काकांनी गेली ५०-५५ वर्षे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत काम केले. त्यांनी जे काम उभे केले ते मला पुढे न्यायचे आहे, त्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. किसन वीर आबांपासूनची जिल्हा बॅंकेत संचालकांच्या नंतर त्यांच्या वारसदाराला संचालक म्हणून सामावून घेण्याची परंपरा काकांच्याबाबतीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाळली नाही, त्याला माझा विरोध असल्याचे कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातील जिल्हा बॅंकेची निवडणूक लढणारे ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीशी बोलता स्पष्ट केले आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कऱ्हाड सोसायटी मतदारसंघात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विरुध्द ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर अशी लढत होत आहे. या मतदारसंघातून यापूर्वी (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर हे ५३ वर्षे संचालक होते. किसन वीर आबांच्यानंतर काकांनी जिल्हा बॅंकेची धुरा सांभाळत बॅंकेचे नाव देशात पोचविले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र ॲड. पाटील यांना सामावून घेतले जावे, अशी अपेक्षा सर्वच स्तरातून होत होती. या पार्श्वभूमीवर ॲड. पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत विलासराव पाटील-उंडाळकर (काका) यांनी ५३ वर्षे संचालक म्हणून काम केले. त्यांनी बॅंकेच्या माध्यमातून जे जे काम उभे केले आहे, ते पुढे चालवायचे आहे. त्यासाठी मी जिल्हा बॅंकेच्या निवडणूक रिंगणात उतरलो आहे. तसेच जिल्हा बॅंकेत अगदी किसन वीरांपासून तात्या, दादाराजेंच्यापर्यंत दिग्गज संचालकांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना काम करण्याची संधी दिली गेली. पण, काकांच्याबाबतीत तसे झाले नाही. जिल्हा बॅंकेची परंपरा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाळली नाही. त्यामुळे मी निवडणूक लढत आहे.’’ पालकमंत्र्यांनी या मतदारसंघात संपर्क मोहीम राबवली आहे, तुमचा प्रचार कशा पध्दतीने चालला आहे, या विषयी ॲड. पाटील म्हणाले, ‘‘आमची माणसे फिरून काम करत आहेत. पण, ते पालकमंत्री असल्याने त्यांचे फिरणे व सभासदांना भेटणे दिसतेय. आमचेही कार्यकर्ते संपर्क ठेऊन आहेत. त्यामुळे निकाल २३ तारखेलाच कळेल.’’
भावनिक मुद्यावर निवडणूक लढत नाही
भावनिकतेचा मुद्दा या निवडणुकीत येऊ शकेल काय, याविषयी विचारले असता ॲड. पाटील म्हणाले, ‘‘भावनिक मुद्दा करून आम्ही निवडणूक लढत नाही. मी केलेले काम आणि काकांनी दिलेले योगदान यातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यातून मतदार काय समजायचे ते समजतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.