प्रांताधिकाऱ्यांचा आदेश; दुकानांच्या वेळेत महत्वपुर्ण बदल, आठवडा बाजारास बंदी

प्रांताधिकाऱ्यांचा आदेश; दुकानांच्या वेळेत महत्वपुर्ण बदल, आठवडा बाजारास बंदी
Updated on

दहिवडी (जि. सातारा) : सलग तीन दिवस कोरोनाबाधितांची संख्या अत्यल्प आढळल्याने 16 दिवसांनंतर शहरातील बाजारपेठ आजपासून (ता. 8) सुरू झाली आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्यास प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी परवानगी दिली आहे. मात्र, आठवडी बाजार भरणार नाही. निर्बंध हटविले नसून ते अंशतः शिथिल करण्यात आले आहेत. 

कोरोनाच्या प्रादुर्भावापासून काहीसे अंतर राखून असलेल्या दहिवडी शहरात कोरोनाने फेब्रुवारी महिन्यात उच्छाद मांडला. मोठ्या प्रमाणात कोविड-19 चे रुग्ण सापडल्यामुळे प्रशासन हादरले. सुरुवातीला 20, 21 व 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी घेतला. तरीही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी 22 फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन संपूर्ण शहर कंटेन्मेंट झोन घोषित केले. त्यामुळे 20 फेब्रुवारीपासून सात मार्चपर्यंत 16 दिवस शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. 5 मार्च रोजी संपूर्ण शहराचे सर्वेक्षण व नागरिकांची तपासणी करण्यात आली.
 
या सर्व उपाययोजनांमुळे गेल्या तीन दिवसांत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली दिसून येते. सर्वेक्षणानंतर शहरात कोरोनाची लक्षणे असलेल्यांची संख्या कमी आढळून आली आहे. त्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांच्या मागणीवरून शहरातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार आजपासून शहरातील बाजारपेठ सुरू होणार आहे. शहरातील कंटेन्मेंट झोन उठविले असले तरी मायक्रो कंटेन्मेंट झोन कायम राहणार आहेत. निर्बंध हटविण्यात आले नसून ते अंशतः शिथिल करण्यात आले आहेत. अचानक धाडी टाकून दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यापुढे कोरोनाबाधितांना घरी विलगीकरणात न ठेवता रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिली. 

विनाकारण कोणालाही दुकानात जास्त वेळ थांबू देऊ नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्कशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये व बाजारपेठेत फिरू नये. 

- धनाजी जाधव, नगराध्यक्ष, दहिवडी 

बाजारपेठेत कायद्याचे उल्लंघन होईल व स्वतःसह इतरांचे आरोग्य धोक्‍यात येईल, असे कृत्य कोणीही करू नये. तसे कोणी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
- राजकुमार भुजबळ, सहायक पोलिस निरीक्षक, दहिवडी 


 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.