सातारा : भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्याच्या नावाने जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधातील तक्रार अर्जांची माळ लागलेली आहे. अंतर्गत कुरघोड्यांच्या या राजकारणात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल ढासळवण्याचा उद्योग करणाऱ्या या असंतुष्ट आत्म्यांचा पोलिस अधीक्षकांनी बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुरघोड्या काही नव्या नाहीत. त्यातही चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेहमीच या कुरघोड्यांतून होणाऱ्या बदनामीला सामोरे जावे लागते. गुन्हेगारी संबंध, आर्थिक व्यवहार अशा अफवांचे पीक सुरवातीला साहेबांच्या कानात ओतायचे. त्यातून इच्छित साध्य न झाल्यास निनावी किंवा बोगस नावाने अर्ज करून समोरच्याला चौकशीच्या फेऱ्यात उभे करण्याचे काम केले जाते. आजवर अनेकदा अशा प्रकारच्या प्रयत्नांतून चांगले काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची मानसिकता बिघडली आहे.
वरिष्ठांनी अशा अर्जाची दखल घेतली नाही तर, त्यांचीही बदनामी करण्याची प्रवृत्ती पोलिस दलात फोफावली आहे. बहुतांश वेळा असे प्रकार हे अवैध धंदेवाले किंवा गुन्हेगारांकडून पुरस्कृत केलेले असतात. त्यांना अडचणीचे ठरतील, त्रास देतील अशा कर्मचाऱ्यांना बाजूला करण्याचा फंडा अवैध धंदेवाल्यांकडून अनेकदा राबवला गेलेला आहे. त्यामध्ये पोलिस दलातील असंतुष्ट त्याचबरोबर मोक्याची जागी नेमणूक तर पाहिजे. परंतु, काम नको, आयते मलिद्याचे वाटेकरी व्हायला आसुसलेल्यांचाही हात असतो.
जिल्हा पोलिस दलाच्या काही शाखांमध्ये अशा बेनामी अर्जांची माळ लावण्याचे उद्योग गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यामध्ये माजी पोलिस अधीक्षकांची बदनामी करण्यालाही या महाभागांनी सोडले नाही. कर्मचाऱ्यांची बदनामी करण्याबरोबरच साहेबांनाही टार्गेट करण्याचे काम यातून केले जात आहे. वरिष्ठांनी कारवाई करू नये म्हणून वेठीस धरण्याचे हे प्रकार शिस्तीच्या पोलिस दलात योग्य नाहीत. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकता बिघडण्याची शक्यता असते. त्यातून कशाला नसती झंझट अशी मानसिकता तयार होते. मनोबल खचल्यास अधिकाऱ्यांनाही कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित काम करून घेण्यात अडचणी निर्माण होतात. याची दखल घेत वरिष्ठांनीही अशा अर्जांच्या चौकशीला किती महत्त्व द्यायचे, संबंधित कर्मचाऱ्यांना चौकशीत कशी वागणूक द्यायची, याचे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे.
झारीतील शुक्राचाऱ्यांवर कारवाई करा
पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी असे प्रकार रोखण्यासाठी झारीतील शुक्राचाऱ्यांवर जरब बसेल, अशी कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिस दलाला विनाकारण बदनाम करणाऱ्या अशा अर्जांची माळ लावणाऱ्यांचा शोध तातडीने घेणे आवश्यक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.