दरडी (Landslide) कोसळण्याचे सत्र सुरू झाल्याने भीतीचे ढग अधिक गडद होऊ लागले आहेत.
पाचगणी : पसरणी घाटातील (Pasarni Ghat) दरडीच्या भीतीबाबत ‘सकाळ’ने दोन महिन्यांपूर्वी (२८ जुलै) बातमी प्रसिद्ध करून ‘रेड अलर्ट’ दिला होता. त्यांनतर दोन महिन्यांतच दरडी (Landslide) कोसळण्याचे सत्र सुरू झाल्याने भीतीचे ढग अधिक गडद होऊ लागले आहेत.
शासकीय पातळीवरील अनास्थेमुळे संकटाने डोके वर काढल्याने नागरिकांच्या जिवाला अधिक घोर लागल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पसरणी घाटातील धोक्याची घंटा वाजविणाऱ्या दरडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे सावट असून, तेथून प्रवास करताना प्रवाशांच्या जिवाला घोर लागत असल्याची बातमी ‘पसरणी घाटातही दरडीची भीती’ या मथळ्याखाली २८ जुलै रोजी बातमी प्रसिद्ध केली होती.
त्यानंतर वाई येथील अभियंता महेश गोंजारी, वाईचे शाखा अभियंता साईराज कुंभार, महाबळेश्वरचे शाखा अभियंता रणजित गवळी, वनपाल चौगुले यांनी पसरणी घाटात तातडीने धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. धोकादायक दरडी हलविणे आवश्यक असल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला होता.
यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून मुंबई, पुणे घाटाच्या पद्धतीने रॉक बोलटिंग करून जाळी बसवली व रस्त्याचे रुंदीकरण केल्यास वाहतुकीच्या दृष्टीने घाट सुरक्षित होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, दरवर्षी उद्भवणाऱ्या अशा नैसर्गिक आपत्तीवर पूर्णतः मात करण्यासाठी शासनाला अद्याप यश आले नाही.
केवळ अशा घटना घडल्या, की शासनास तात्पुरती जाग येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना पसरणी घाटातून नियमित प्रवास करणारे किसन वीर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जयवंतराव चौधरी म्हणाले, ‘‘भय संपले नसून, धोक्याचा इशारा देणाऱ्या अनेक दरडी केव्हाही मोकळीक घेण्याच्या अवस्थेत केवळ शासनाच्या अनास्थेमुळेच आहेत.
अशा घटना घडल्या तरच शासनाला तात्पुरती जाग येते.’’ दरम्यान, वाई, पाचगणी दरम्यान दांडेघरच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारी सलग ओळीत टांगत्या तलवारीप्रमाणे आकाशाला गवसणी घालत उभ्या असलेल्या धोकादायक सिल्व्हर ओकच्या झाडांची मागणी करूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.