Patan Assembly Election : पाटणची जनता महाविकासच्या पाठीशी : हर्षद कदम

Patan Vidhan Sabha Election : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. पाटण मतदारसंघातून जनता मला निवडून देईल, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार भानुप्रताप ऊर्फ हर्षद कदम यांनी व्यक्त केला.
Patan Election
Patan Electionsakal
Updated on

मल्हारपेठ : स्वाभिमानी विचाराची शिदोरी घेऊन मतदारांपर्यंत जात आहे. जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभी आहे. लोकांचे मिळत असलेले प्रेम, जिव्हाळा आणि पाठिंब्यावर मला विक्रमी मताधिक्य मिळेल.

राज्यात या वेळी बदल होऊन महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. पाटण मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जनता मला निवडून देईल, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार भानुप्रताप ऊर्फ हर्षद कदम यांनी व्यक्त केला.

मल्हारपेठ विभागातील गावभेट प्रचार दौऱ्यात कदम बोलत होते. तालुकाप्रमुख सुरेश पाटील, संजय संकपाळ, सचिन आचरे, रामचंद्र पवार, दादा पानस्कर, संतोष मोहिते आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

श्री. कदम म्हणाले, ‘‘राज्यात या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस व मित्रपक्षाचे सरकार येणार आहे. यामध्ये पाटण मतदारसंघातूनही ऐतिहासिक निकाल येणार असून, मतदारसंघातील जनता आघाडीच्या बाजूने उभी राहिल्याचे दिसेल. रस्ते, सभामंडप झाले म्हणजे विकास नव्हे. मतदारसंघात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली आहे. तरुणवर्ग नोकरी नसल्याने अस्वस्थ आहे. औद्योगीकरणाचा तर पुरता बोऱ्या उडाला आहे. धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त आजही न्यायासाठी झगडत आहेत.

येथील डोंगरदऱ्यात राहणारे नागरिक आजही हलाखीचे जीवन जगत आहे. माता-भगिनींच्या प्रश्नांकडे तर पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. लोकांना गटातटात अडकून गावागावांत संघर्ष निर्माण केला गेला.

विकासाच्या नावाखाली स्वतःची तुंबडी भरायचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे. विकास फक्त त्यांचा झाला, जनतेचा नाही. मतदारसंघात निकृष्ट दर्जाची कामे झाली. कॉन्ट्रॅक्टर लॉबी तयार करून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवायची असे यांचे धोरण आहे. येथे आजही उत्तम आरोग्यसेवा मिळत नाही. उपचार मिळविण्याकरिता लोकांना कऱ्हाड, साताऱ्याला जावे लागते.’’

सगळीकडे दारूबंदीला प्रोत्साहन दिले जात असताना तालुक्यात बारची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातून त्यांना युवकांचे कसले भविष्य घडवायचे आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून समृद्धी घडवण्याचे सोडून त्या संस्थांचा राजकीय अड्डा बनवला आहे. पवनचक्की, पर्यटन विकास, कारखानदारीच्या माध्यमातून स्थानिकांना देशोधडीला लावले.

निवडणुका आल्या, की यांना जनतेचा कळवळा येतो. मात्र, जनतेसाठी मी चोवीस तास उपलब्ध असेन. लोकांचे मिळत असलेले प्रेम, जिव्हाळा आणि पाठिंब्यावर मला विक्रमी मताधिक्य मिळेल, यात शंका नाही. स्वाभिमानी विचाराची शिदोरी घेऊन मतदारांपर्यंत जात आहे. जनहिताचे काम पाहता जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभी आहे, असेही त्यांनी सांगितले.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.