निमसोड/वडूज (सातारा) : केंद्रातील जुलमी मोदी सरकार (Modi Government) खोटे स्वप्न दाखवून सत्तेत आले. महत्त्वाच्या सरकारी संस्था विकून सात वर्षे देश लुटण्याचे काम भाजपने (BJP) केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अपमानित करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. या जुलमी राजवटीला हटविण्यासाठी नव्या स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी हुतात्म्यांची भूमी असलेल्या वडूजनगरीतून सुरुवात होत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केले.
महत्त्वाच्या सरकारी संस्था विकून सात वर्षे देश लुटण्याचे काम भाजपने केले.
येथील हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्यासाठी लढलेल्या व बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कॉँग्रेसच्या वतीने हुतात्मा अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री. पटोले बोलत होते. या वेळी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, पक्षाच्या सहप्रभारी सोनल पटेल, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, उल्हास पवार, सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस विनायक देशमुख, अभय छाजेड, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, गुलाबराव घोरपडे, पृथ्वीराज पाटील, भानुदास माळी, मनेष राऊत आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महसूलमंत्री थोरात म्हणाले, ‘‘केंद्र सरकारच्या जुलमी राजवटीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. देशावरील ५५ हजार कोटी रुपये कर्जाचे एक लाख दहा हजार कोटीपर्यंत पोचले आहे. जुलमी सरकार विरोधात जर बोलाल, तर इडीची चौकशी लावली जाते. आम्ही राज्यात लोकशाही आघाडीचे सरकार केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणांच्या विरोधात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकार म्हणून महाराष्ट्रात काम करीत आहोत.’’ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय एनजीओ संस्थांनी केलेल्या पाहणीमध्ये भारतामध्ये लोकशाही लोप पावत चालली असून, हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. आपले संविधान वाचविण्याची जबाबदारी तुम्हा- आम्हा वरती आली आहे.’’
एच. के. पाटील म्हणाले, ‘‘देशाला विकणाऱ्या सरकारचा धिक्कार करून ते रोखण्याचे काम सध्या काँग्रेस करीत आहे. ‘अंबानी- अदानी’ या खासगी क्षेत्रातील लोकांना सरकारी संस्था विकण्याचे काम ‘ईस्ट-इंडिया’ कंपनीप्रमाणे मोदी सरकार करीत आहे.’’ या वेळी यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजित कदम, विनायक देशमुख, बसवराज पाटील आदींची भाषणे झाली. स्वागताध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र शेलार सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी आभार मानले. या प्रसंगी अशोकराव गोडसे, ॲड. विजयराव कणसे, डॉ. महेश गुरव, डॉ. विवेक देशमुख, बाबासाहेब माने, विराज शिंदे, रजनी पवार, शिवराज मोरे, डॉ. संतोष गोडसे, विजय शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, स्वातंत्र्यसैनिक व वारसांचा सूती हार व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या जयराम स्वामी वडगाव ते वडूजपर्यंत ५०० कार्यकर्त्यांची हुतात्मा ज्योती सोबत दौड करण्यात आली होती. कळंबी, पुसेसावळी, उंचीठाणे, वर्धनगड आदी ठिकाणाहून हुतात्मा ज्योतीचे आयोजन करण्यात आले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.