साताऱ्याचा बालेकिल्ला पोखरला जातोय?

बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला
राष्ट्रवादीचा बालेकिल्लाSakal
Updated on

बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यामागे भाजपने जाणीवपूर्वक घातलेले लक्ष हे जसे कारण आहे, तसेच ऱाष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत नेत्यांची गटबाजी हाही त्यातला महत्त्वाचा भाग आहे. काही नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा, जिल्ह्यात आपली पकड राहण्यासाठी केली जाणारी कारस्थाने आणि अजित पवार आणि शरद पवार असे सरळसरळ पडलेले दोन गट हाही महत्त्वाचा फॅक्टर पक्ष संघटनेला आणखी कमकुवत करण्याकडे घेऊन निघालेला आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगाला राज्यात दोन वर्षे पूर्ण होत असताना पक्षाध्यक्ष यावर किती परिणामकारक उपाय योजतात, यावर या बालेकिल्ल्याचे भवितव्य अवलंबून आहे.

पक्ष स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात भाजपने आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन राजेंचा मधल्या काळात झालेला भाजपप्रवेश हा या बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळवण्याचाच प्रकार होता. या दोन दिग्गज नेत्यांना आणि माणचे आमदार जयकुमार गोरे यांना पक्षात घेऊन भाजपने आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न केलेला असला तरी तो राष्ट्रवादीला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याइतका पुरेसा ठरलेला नाही. त्याचे कारण असे, की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारा फार मोठा वर्ग या जिल्ह्यात अजूनही आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

परिणामी, सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला पूर्णपणे खिंडार पाडण्याचे भाजपचे मनसुबे अद्याप यशस्वी झालेले नाहीत. असे असले तरी राष्ट्रवादीची या जिल्ह्यातील पूर्वीची ताकद मात्र कमी झाली आहे, हे मान्य करावे लागेल. या जिल्ह्याने १९९९ मध्ये पक्षस्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत दहापैकी नऊ आमदार राष्ट्रवादीला दिले होते. आजच्या परिस्थितीकडे पाहिले, तर जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे फक्त आठपैकी तीन आमदार राहिले आहेत. भाजपकडे दोन, शिवसेनेकडे दोन आणि काँग्रेसकडे एक असे जिल्ह्याचे पक्षीय बलाबल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अशी दिवसेंदिवस कमी होत जाण्यामागे भाजपने जाणीवपूर्वक घातलेले लक्ष हे जसे कारण आहे, तसेच ऱाष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत नेत्यांची गटबाजी हाही त्यातला महत्त्वाचा भाग आहे. काही नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा, जिल्ह्यात आपली पकड राहण्यासाठी केली जाणारी कारस्थाने आणि अजित पवार आणि शरद पवार असे सरळसरळ पडलेले दोन गट हाही महत्त्वाचा फॅक्टर पक्ष संघटनेला आणखी कमकुवत करण्याकडे घेऊन निघालेला आहे.

दोन राजे, आमदार जयकुमार गोरे आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (जिल्ह्यातील फलटण विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतो) यांना पक्षात घेऊन भाजपने आपली ताकद वाढविली असली, तरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अजित पवार यांच्यातील सख्य शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशानंतरही कायम आहे आणि ते लपून राहिलेले नाही.

शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशानंतरही त्यांच्याकडे असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आत्ताच झालेल्या निवडणुकीपर्यंत कायम ठेवणे असो किंवा नुकत्याच झालेल्या बॅंकेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे यांना बरोबर घेऊन केलेली पॅनेलनिर्मिती असो किंवा सातारा-जावळी मतदारसंघातील विकासकामांना भरभरून निधी पुरविल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजेनी अजित पवारांची जाहीर भलवण करणे असो, या सगळ्या बाबींतून या दोघांतील मैत्री ‘शाबूत’ असल्याचे साऱ्या जिल्ह्याला ठाऊक झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी सातारा- जावळीत काही समीकरणे बदलली गेलीच, तर जिल्ह्यावासियांना त्याचे मुळीच आश्‍चर्य वाटणार नाही.

राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू असताना एकेकाळी प्राबल्य असलेल्या या जिल्ह्यात काँग्रेस फक्त कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातच धुकधुकते आहे. इतर मतदारसंघांत काँग्रेसचे पुरते पाणिपतच झाले आहे. (कै.) विलासराव पाटील उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोन प्रभावी नेत्यांमुळेच आजपर्यंत कऱ्हाड दक्षिणमध्ये काँग्रेस तग धरून राहिली इतकेच.

सातारा जिल्ह्याची राजकीय पार्श्‍वभूमी ही अशी असताना राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आपली दोन वर्षे पूर्ण केली आहेत. महाविकास आघाडीच्या या दोन वर्षांच्या कामगिरीबद्दल जिल्ह्यातील जनता समाधानी असल्याचा सर्वसाधारण कौल आहे. खरेतर यात आश्‍चर्य मानण्यासारखे काहीच नाही. कारण, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग साकारता येईल, अशी परिस्थिती निर्माण करण्यात या सातारा जिल्ह्याच्या भूमीचाच वाटा आहे, असे इथल्या जनतेचे ठाम मत आहे.

कारण, साताऱ्यातल्या त्या ऐतिहासिक पावसातल्या सभेनंतरच राज्यातलं वातावरण बदललं. त्या सभेने भाजप लाट नेस्तनाबूत केली आणि महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याइतकं संख्याबळ राष्ट्रवादीला मिळालं. हा सातारा जिल्ह्याचा करिश्‍मा असल्याचं इथली जनता मानते. आणि त्यातला तथ्यांश नाकारताही येणार नाही. त्यामुळे राज्याच्या आगामी निवडणुकीसाठीही महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, तर इथली जनता त्याचे स्वागतच करेल.

आघाडीतील तिन्ही पक्षांची जिल्ह्यात जी काही ताकद आहे, तिला हा प्रयोग पूरकच ठरेल, असे सध्याचे चित्र आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मात्र जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याची सूतराम शक्यता नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती स्वतंत्रपणे आणि नगरपालिका स्थानिक गटांतच लढल्या जातील.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी शिवसेनेचे दोन आमदार जिल्ह्यात आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे पाटण मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देसाईंना पराभव चाखावा लागला. त्यामुळे पाटणमधील त्यांचे पारंपारिक विरोधक राष्ट्रवादीचे विक्रमसिंह पाटणकर यांचे कार्यकर्ते निश्‍चितच सुखावले आहेत.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला
महिला मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत पंकजा मुंडेंपेक्षा 'या' नेत्या वरचढ

याऊलट कोरेगावात शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा उमेदवार मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करीत विजयी झालेला आहे. वास्तविक, कोरेगावात शिवसेनेचा आमदार असला, तरी त्यांना तेथील लोकांनी पक्ष म्हणून मतदार केलेले नाही, तर तो स्वतः आमदार महेश शिंदे यांचा करिश्‍मा होता. त्यांनी गेल्या दोन वर्षांत तेथे आपले स्थान बळकट केले आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्याचे आगामी काळातील राजकीय चित्र रेखाटताना नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीतील संदर्भ महत्त्वाचे ठरतात. विधान परिषदेचे सभापती आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वसमावेशक पॅनेल जिल्हा बँकेसाठी घडवून आणले. भाजपचे आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले या सर्वसमावेशक पॅनेलसोबत होते. महाविकास आघाडीतील घटक पक्षातील शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई आणि काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर हे मात्र या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये येऊ शकले नाहीत. शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीसोबत राहिले. स्वतः बिनविरोध झाले.

उदयनराजेही अखेरच्या क्षणी बिनविरोध झाले. मात्र, शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यक्षेत्रातील जावळी सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे मात्र पराभूत झाले. जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत राहून राष्ट्रवादीच्याच आमदाराला पराभूत करण्यास कारणीभूत ठरले. इकडे कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे भाजपचे अतुल भोसले यांचे उघड सहकार्य घेत जिल्हा बँकेवर निवडून गेले.

कोरेगावात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले सुनील माने यांना जिल्हा बँकेची उमेदवारी नाकारली गेली आणि तेथे पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. जिल्हा बँक निवडणुकीतील या साऱ्या घडामोडींमुळे अनेक मतदारसंघांत नवी समीकरणे तयार होत आहेत आणि होणार आहेत. त्यांचे प्रतिबंब जिल्ह्याच्या आगामी काळातील राजकारणात उमटणार आहेत. बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. परिणामी, बँकेतील त्यांचे संख्याबळ पूर्वीच्या तुलनेत घटले.

शशिकांत शिंदेंसारख्या पक्षनिष्ठ आमदाराचा पराभव घडवला गेला. या पक्षांतर्गत कुरघोड्या थांबविण्यात पक्षनेतृत्वाला किती प्रमाणात यश येईल, यावर राष्ट्रवादीचे या जिल्ह्यावरील वर्चस्व कायम राहणार, की कमी होणार हे स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील दोन राजेंना पक्षात घेऊन आपली खुंटी बळकट करण्याचा प्रयत्न करणारा भाजप या बालेकिल्ल्यावर आणखी निर्वाणीचे हल्ले करणार का, यावरही बरंच काही अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.