छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाचा त्यांचा काही प्रस्ताव असेल तर मला माहिती नाही. सरकारकडेही तशी कोणती मागणी नाही.
सातारा : पालकमंत्री म्हणून मला जे अधिकार आहेत, सरकारला जे अधिकार आहेत, त्याचा वापर करून शिवस्मारकाला धक्का न लावता पोवई नाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांचे स्मारक होणारच, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
संपूर्ण पोवई नाक्याला नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळा परिसराला शिवतीर्थ असे म्हटले जाते. पोवई नाका परिसरात बरीच जागा शिल्लक आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक व्हावे, ही सातारा शहरातील अनेकांची लोकभावना आहे.
त्यानुसार पोवई नाका परिसरात हे स्मारक होणारच असून, त्याचा कोणताही परिणाम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरावर होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून पोवई नाका परिसरात होणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने वादंग सुरू आहे. या वादगांच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘आमच्या प्रस्तावात शिवछत्रपती पुतळा परिसर अर्थात शिवतीर्थ असा कोणताही उल्लेख नाही. आमचा प्रस्ताव पोवई नाका येथील मोकळ्या जागेत, असा उल्लेख आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर हा शिवतीर्थ म्हणून संबोधला जातो. संपूर्ण पोवई नाका नव्हे. संपूर्ण पोवई नाक्याला शिवतीर्थ म्हणतात, असा शासकीय कागद, तसा शासकीय आदेश असला, तर मला दाखवा. मोकळी जागा आहे, तिथे कोणीही काहीही करू शकते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राजघराण्यातील व्यक्तींना जसा आदर आहे, तसाच आम्हालाही मावळे म्हणून आहेच.
या पुतळ्याचे अनावरण लोकनेत्यांच्या हस्ते झाले आहे. या पुतळा परिसराला कोणताही धक्का न लावता मोकळ्या जागी लोकनेत्यांचे स्मारक होत आहे. येथे पूर्वी युनायटेड वेस्टर्न आयलँड होते. ते ग्रेड सेपरेटरच्या कामादरम्यान काढण्यात आले. त्याठिकाणी आम्ही हे स्मारक करत आहोत.’’
या कामाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराच्या सौंदर्यावर कोणताही परिणाम होणार नाही. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक व्हावे, अशी साताऱ्यातील अनेकांची इच्छा आहे. त्या लोकभावनेचा आदर करतच हे स्मारक होत आहे. तशी काही निवेदने देखील माझ्याकडे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याच अनुषंगाने राजघराण्याची काही शंका असेल, तर प्रत्यक्ष चर्चा करण्याची तयारीही त्यांनी या वेळी दाखवली.
पोवईनाका परिसरातील संकल्पित लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदने दिल्याबाबत विचारले असता, शंभूराज देसाई म्हणाले, की सरकार सरकारचे काम करेल. अशी निवेदने दररोज प्रशासनाकडे येत असतात. त्यावर काय कार्यवाही करायची हा प्रशासनाचा विषय आहे.
सरकार म्हणून, पालकमंत्री म्हणून मला जे अधिकार आहेत त्याचा वापर करून शिवस्मारकाला धक्का न लावता लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक पोवई नाका परिसरात होणारच. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकासाठीचा जो प्रस्ताव शासनाकडे आहे. त्यात कुठेही शिवस्मारक परिसर असा उल्लेख नाही. त्यात फक्त पोवई नाका परिसर असे नमूद असून, त्याचा विपर्यास करण्यात येत असल्याचेही शंभूराज देसाई यांनी या वेळी सांगितले.
राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराची पाहणी केल्याबाबत ते म्हणाले, ‘‘ती भेट कधी दिली? तर आमचा प्रस्ताव आल्यानंतर. त्याच्या अगोदर सरकारकडे मागणी नाही. सरकारची मान्यता नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाचा त्यांचा काही प्रस्ताव असेल तर मला माहिती नाही. सरकारकडेही तशी कोणती मागणी नाही, प्रस्ताव नाही.’’
पालिकेकडे तशी मागणी केली आहे, असे विचारताच श्री. देसाई यांनी तशी त्यांनी मागणी केली असेल तपासून घेऊ, असे उत्तर दिले. राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘‘मला त्याची काही कल्पना नाही. मी उद्या मुंबईला जाणार आहे, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे,’’ असे म्हणत त्यांनी त्यावर जास्तीचे बोलणे टाळले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. याच बैठकीत पोवई नाका येथील प्रस्तावित लोकनेत्यांच्या स्मारकाच्या विषयावर देखील चर्चा होणार होती. हा विषय आणि त्याला होणारा विरोध लक्षात घेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चौकशी करूनच शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांव्यतिरिक्त इतरांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यात येत नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.