कऱ्हाड : सातारा लोकसभा निवडणुकीच्या (Satara Loksabha Election) निमित्ताने जिल्ह्यात भाजपची ताकद दाखविण्यासह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार करण्याचा निर्धार जाहीर सभेत व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, भाजपचे नेते अतुल भोसले यांच्यासह अनेकांनी निर्धारावर ठाम राहत भाजपचा खासदार होण्यासाठी कंबर कसून काम करण्याचे सर्वांना आवाहन करत आश्वासितही केले.
मात्र, जोपर्यंत भाजपअंतर्गत नेत्यांमधील मतभेदांवर ठोस उपाय निघत नाही, तोपर्यंत भाजपला खासदारकीत विजय मिळवता येणार नाही, ही वस्तुस्थिती भाजपला स्वीकारावी लागेल. जिल्ह्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. कऱ्हाड व सातारा लोकसभा मतदारसंघाने नेहमीच काँग्रेसच्या बाजूने कौल दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीचेच प्राबल्य राहिले आहे. कऱ्हाड व सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचेच प्राबल्य आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत कऱ्हाड लोकसभा मतदारसंघ रद्द झाला. सातारा लोकसभा निर्मितीनंतरही त्यावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले आहे. त्याला धक्का देण्यासाठी भाजप राजकीय खेळी करत आहे.
मात्र, नऊ वर्षांपासून त्यांना त्यात अपेक्षित यश आले नाही. सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जात होता. त्यामुळे येथे थेट भाजपच्या चिन्हावर निवडणूक झाली नाही. चार वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील व उदयनराजे भोसले यांच्यात थेट लढत झाली. त्यावेळी पहिल्यांदा भाजपकडे चिन्ह आले. निवडणूक झाली.
मात्र, त्यात अपेक्षित यश आले नाही. तेथे राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यानंतरच्या काळात भाजपने सातत्याने सातारा लोकसभा मतदारसंघात विजयी घोडदौड करण्याचा निर्धार करत येथे राष्ट्रीय नेत्यांचे दौरे घडवले, अजूनही सुरूच आहेत. त्या सगळ्यामागे भाजपला सातारा लोकसभा मतदारसंघ मिळवायचा आहे. भाजपने ताकद लावण्याचा निर्धार केला असला, तरी तालुकानिहाय भाजपची ताकद व तेथील नेत्यांचा समन्वयाची जाणीव नेत्यांना असण्याची गरज आहे. त्याचा अभाव दिसतो.
राष्ट्रवादी, काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या स्थानिक ताकदीशी दोन हात करताना पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीची नऊ वर्षांतील कामाचा आढावा व राज्य सरकारच्या योजनांचा उपयोग होईल, अशी भाजपची धारणा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातून त्यांनी त्याच मुद्द्यांवर प्रकाश टाकला. मात्र, स्थानिक मुद्द्यांचे काय ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
भाजपचा उमेदवार कोण? ते अद्यापही गुलदस्त्यात ठेवत भाजपने टार्गेट २०२४ गृहीत धरत कंबर कसली आहे. मात्र, कऱ्हाड व पाटण तालुक्यातील मतदारांचा कौलही येथे महत्त्वाचा ठरतो. पाटणसह कऱ्हाड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या राजकीय खेळीही अभ्यासाचा विषय आहे. त्या तिन्ही ठिकाणच्या भाजपचे नेत्यांमधील समन्वयाचा अभाव भाजपलाच मारक ठरण्याची चिन्हे आहेत.
तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिन्ही मतदारसंघांतील नेत्यांमधील वाद मिटवा व एकत्रित काम करा, यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निवडीनंतर एकदाच भागात येऊन गेले आहेत. त्यामुळे भाजपची अंतर्गत शकले, वादच भाजपच्याच मिशन सातारा २०२४ संकल्पातील अडथळा ठरणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यावर भाजप काय ठोस निर्णय घेणार? यावर पुढची वाटचाल ठरणार आहे.
कऱ्हाड दक्षिण, उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे जाळे चांगले आहे. त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर पक्षाची भिस्त असताना अनेकदा स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून निर्णय घेतले जात असल्याच्या तक्रारी नेत्यांकडे झाल्या आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांवर भिस्त असताना त्यांना डावलण्याची होणारी राजकीय खेळीही पक्ष संघटनेला बाधा ठरण्याची भीती यानिमित्ताने दिसते आहे. त्यावर ठोस उपायांची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.