पोलिसी कारवाईच्या भीतीने अनेकांनी पुसेसावळी येथून पोबारा केल्याचे समोर येत आहे.
राजाचे कुर्ले/पुसेसावळी : दंगलप्रकरणी (Pusesawali Riots) ताब्यातील युवकांचा घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत पुसेसावळी येथील व्यापारी, नागरिकांनी बुधवारी बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे त्या परिसरातील सर्व व्यवहार बंद राहिले होते.
या पार्श्वभूमीवर व्यापारी, नागरिक आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांत संयुक्त चर्चा झाली. चर्चेत पोलिसांनी सुरू असणारा तपास, संशयितांना ताब्यात घेताना तपासले जाणारे पुरावे, इतर कायदेशीर प्रक्रियेची माहिती देत कोणावरही अन्याय होणार नसल्याचे आश्वासन दिले, तसेच गणेशोत्सवातील गैरसोय टाळण्यासाठी बंद मागे घेण्याचे आवाहन केले.
या आवाहनानुसार व्यापारी, नागरिकांनी बंद मागे घेत गुरुवारपासून व्यवहार सुरळीत करण्याचा निर्णय घेतला. समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह मजकुरानंतर पुसेसावळी येथे उसळलेल्या दंगलीत नूरहसन शिकलगार (वय २७) यांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी पुसेसावळी, जयराम स्वामी वडगावसह इतर गावांतील ३४ जणांना अटक केली असून, गुन्हा दाखल असणारे चार जण पसार आहेत. अटकेतील संशयितांची पोलिस कोठडीत चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून मिळालेली माहिती तसेच पुसेसावळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत इतरांना ताब्यात घेण्याचे सत्र पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसी कारवाईच्या भीतीने अनेकांनी पुसेसावळी येथून पोबारा केल्याचे समोर येत आहे. सद्य:स्थितीत चौकशी, फुटेज पडताळणी व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू असून, पुसेसावळी येथील जनजीवन काहीअंशी अजूनही विस्कळित आहे. मंगळवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होते.
बाजारपेठेतील व्यवहार तसेच जनजीवन पूर्वपदावर यावे, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, त्याला काहीअंशी प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली होती. बुधवारी सकाळी व्यापारी, नागरिक पुसेसावळी येथे जमले. त्यांच्याकडून दंगलीशी संबंध नसणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप झाला. अटकेतील संशयितांची सुटका होईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा इरादा व्यक्त करत नागरिक, व्यापाऱ्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांची पोलिस ठाण्यात भेट घेतली.
नागरिक, व्यापाऱ्यांनी या वेळी अटक केलेल्यांना न्याय मिळावा, तसेच प्रकरणाचा तपास निष्पक्ष करण्याची, घटनेशी संबंध नसणाऱ्यांना कोणताही त्रास पोलिसांकडून होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी केली. याचवेळी अटकेतील युवकांच्या नातेवाइकांनी, आमच्या मुलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून त्यांना गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. चौकशी करून त्यांना सोडा, अशी मागणी केली, तसेच त्याची कार्यवाही होईपर्यंत बंद पाळणार असल्याचे सांगितले.
म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपास पूर्णपणे निष्पक्ष सुरू असून, कोणतीही कारवाई त्रास देण्याच्या उद्देशाने करण्यात येत नाही. पूर्ण चौकशी, योग्य तपास आणि इतर बाबींची पडताळणी केल्याशिवाय कोणालाही ताब्यात घेतले जात नसल्याचे सांगितले. दोषी नसणाऱ्यांवर कारवाई होणार नाही. कोणावरही अन्याय होणार नाही. कोणालाही गोवण्यात येणार नाही, असे आश्वासन देत तपास अत्यंत योग्य पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले.
हे सांगत असतानाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. नागरिकांना आवश्यक असणारे साहित्य खरेदी करता यावे, तसेच त्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय बदलणे आवश्यक आहे. बंद मागे न घेतल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी होण्याबरोबरच पुसेसावळीवर अवलंबून इतर गावांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांनी बंद मागे घेत प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले.
उपस्थित केलेल्या शंका व त्यावर पोलिसांनी दिलेली उत्तरे, तांत्रिक व इतर कायदेशीर बाबींची माहिती घेतल्यानंतर नागरिकांनी गुरुवारी सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पुसेसावळीतील जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होणार असून, परिस्थितीवर देखरेखीसाठी त्याठिकाणचा बंदोबस्त कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.